सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 10:20 IST

चार वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने पापे घेणे लैंगिक अत्याचारच, मुंबई पोक्सो कोर्टाकडून ठेकेदाराला 5 वर्षे कैद

लहान मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेणे हे लाड किंवा प्रेम नाही, तर लैंगिक अत्याचार आहे, असे मुंबईतील विशेष पोक्सो कोर्टाने म्हटले आहे.

लहान मुलाचे किंवा मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेणे म्हणजे स्नेह किंवा लाड नव्हे, तर थेट लैंगिक अत्याचार आहे, असे मुंबईतील विशेष पोक्सो (POCSO) कोर्टाने स्पष्ट केले आहे. या निकालात कोर्टाने 50 वर्षांच्या ठेकेदाराला 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मार्च 2025 मध्ये घडलेल्या या प्रकरणातील हा निकाल समाजासाठी मोठा धडा मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 3 मार्च 2025 रोजी घडली. चार वर्षांची मुलगी आईच्या पुढे पुढे चालत एका मंदिराकडे निघाली होती. त्या वेळी 50 वर्षांच्या आरोपी ठेकेदाराने संधी साधून तिला पकडले, तिची मान आणि हात बळजबरीने धरले आणि तिचे जबरदस्तीने पापे घेतले. तिच्या गालावर आणि मानेच्या मागच्या बाजूला चावल्यासारखेही केले. घाबरलेली आणि दुखावलेली मुलगी जोरजोरात रडू लागली. तिचा आवाज ऐकून धावून आलेल्या स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत आरोपीला रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टाच्या न्यायाधीश ऋचा डी. खेडेकर यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. चिमुरडीचे चुंबन घेण्यामागे फक्त स्नेह आणि प्रेम व्यक्त करण्याचा हेतू होता, असा युक्तिवाद आरोपीने कोर्टात केला होता. कोर्टाने तो फेटाळून लावला.

लहान मुले घरातल्या किंवा ओळखीच्या माणसांबद्दल सहसा साशंक नसतात. अशी माणसे कधी कधी मुलांना उचलून घेतात, लाड करतात आणि पुन्हा आईच्या स्वाधीन करतात. पण या प्रकरणात आरोपी पूर्णपणे अनोळखी होता आणि त्याचे कृत्य अत्यंत विकृत व अनैसर्गिक होते, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

मुलगी फक्त चार वर्षांची असल्याने तिला शिकवून आणले आहे, हा बचाव पक्षाचा युक्तिवादही कोर्टाने फेटाळला. लहान वयामुळे मुलीच्या साक्षीला काही मर्यादा असू शकतात, पण घटनेनंतर तिने दिलेली साक्ष, तिची देहबोली आणि वैद्यकीय पुराव्यांची साक्ष अत्यंत सुसंगत व विश्वासार्ह आहे, असे कोर्टाने सांगितले.

आरोपीच्या वकिलांनी असाही दावा केला होता की, आरोपीने तक्रारदाराच्या घरी बांधकाम केले होते आणि त्याच्या मजुरीचे 70 हजार रुपये येणे बाकी असल्यामुळे त्याला मुद्दाम गोवण्यात आले आहे. हा मुद्दा खटल्याच्या अखेरीस अचानक पुढे आणण्यात आला आणि त्याला कोणतेही कागदपत्र किंवा तोंडी पुरावा नव्हता. म्हणून कोर्टाने तो "नंतर गढलेला बनाव" म्हणून फेटाळला.

शिक्षेबाबत सांगायचे तर, दोषी ठरलेल्या 50 वर्षांच्या आरोपीला 5 वर्षांचा सश्रम कारावास झाला आहे. तो 3 मार्च 2025 पासून, म्हणजे घटनेच्या दिवसापासून अटकेत आहे. तुरुंगात काढलेला हा काळ एकूण शिक्षेतून वजा केला जाईल. याशिवाय कोर्टाने 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी 2 महिने साधी शिक्षा भोगावी लागेल. तसेच पीडित चिमुरडीला 5 हजार रुपयांची कायदेशीर भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

ही शिक्षा समाजासाठी स्पष्ट संदेश ठरायला हवी, म्हणजे भविष्यात कोणीही अल्पवयीन पीडितेविरुद्ध अशी घृणास्पद कृती करण्याची हिंमत करणार नाही, असे न्यायाधीश ऋचा डी. खेडेकर यांनी शिक्षा सुनावताना अत्यंत कठोर शब्दांत नमूद केले. चार वर्षांच्या मुलीवरील अशा गंभीर हल्ल्यासारख्या प्रकरणात सुरुवातीपासूनच कडक कायदा आणि न्यायदान झाले तरच अशा गुन्ह्यांना आळा बसेल, असेही त्यांनी म्हटले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ