सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
11:46 IST

मालेगाव तालुक्यातील चिमुरडीच्या खून प्रकरणात आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

साडेचार वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार व खूनप्रकरणी मालेगावच्या न्यायालयाने फाशी सुनावली; पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देण्याचे आदेश.

मालेगाव तालुक्यातील साडेचार वर्षांच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 16 ऑक्टोबर रोजी, म्हणजे घटनेनंतर तब्बल दहा महिन्यांनी, मालेगावच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयातील पोक्सो जलदगती न्यायालयात हा निकाल देण्यात आला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार 16 नोव्हेंबर 2025 रोजी 21 वर्षांच्या विजय खैरनार याने या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले आणि तिचा गळा आवळून अमानुषपणे खून केला, असा आरोप होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे न्यायालय जन्मठेप सुनावणार की फाशी, याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते.

जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी निकाल देताना हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. निकालाच्या वेळी आरोपी विजय खैरनार आणि त्याचे वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते.

मालेगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सुरुवातीला अवघ्या 23 दिवसांत 425 पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले होते. या खटल्यात आतापर्यंत पोलीस, गावकरी, पीडितेचे कुटुंब, वैद्यकीय अधिकारी अशा 24 साक्षीदारांची तपासणी झाली आहे. शासनाने नेमलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भक्कम पुराव्यांच्या आधारे कोर्टात बाजू मांडली. त्यांच्यासोबत ॲड. स्नेहा शर्मा ठाकरे आणि ॲड. संजय सोनवणे यांनीही पीडितेच्या बाजूने काम पाहिले, तर आरोपीकडून ॲड. राठी यांनी कामकाज बघितले.

यापूर्वीच्या सुनावणीत आरोपी विजय खैरनार याच्यावर दोष निश्चिती करण्यात आली होती. त्यावेळी कोर्टाने त्याला स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधीही दिली होती. तसेच त्याच्या वर्तणुकीबाबत पोलीस, मानसोपचार तज्ज्ञ आणि जेलर यांच्याकडून अहवाल कोर्टात सादर करण्यात आले होते.

निकालाच्या वेळी पीडितेचे कुटुंबीय, मंत्री दादा भुसे यांच्यासह सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही कोर्टाच्या परिसरात उपस्थित होते. आता आरोपीला या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात 30 दिवसांच्या आत दाद मागता येऊ शकते, अशीही माहिती आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ