एप्रिल ते ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत 450 टक्क्यांची विक्रमी वाढ, टीव्हीएस, बजाज आणि एथर आघाडीवर
भारतातून होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीने FY2027 च्या सुरुवातीच्या पाच महिन्यांतच विक्रमी टप्पा गाठला आहे. भारतीय आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू होते, त्यामुळे FY2027 चे पहिले पाच महिने म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट 2026 हा कालावधी आहे. या पाच महिन्यांत एकूण 15,418 इलेक्ट्रिक स्कूटर परदेशात पाठवण्यात आल्या. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा फक्त 2,807 इतका होता. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत या निर्यातीत जवळपास 450 टक्के इतकी प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे.
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असतानाच परदेशातील बाजारपेठेतही मेड-इन-इंडिया ई-स्कूटरला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती, पर्यावरणपूरक वाहनांकडे वाढणारा कल आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक अशी पायाभूत सुविधा हळूहळू परदेशातही तयार होत असल्यामुळे या निर्यातीला बळ मिळत आहे. यात नेपाळ हे भारतीय इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सगळ्यात मोठं मार्केट ठरलं आहे. त्याचबरोबर श्रीलंकेतही भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांची उपस्थिती वेगाने वाढते आहे.
या निर्यातीत टीव्हीएस मोटर कंपनी सगळ्यात पुढे आहे. कंपनीने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात एकूण 6,702 इलेक्ट्रिक स्कूटर निर्यात केल्या. यात 5,738 आयक्यूब आणि 964 ऑर्बिटर या दोन मॉडेल्सच्या स्कूटरचा समावेश आहे. एकूण इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत टीव्हीएसचा वाटा तब्बल 44 टक्के इतका आहे.
बजाज ऑटोने या काळात 4,818 चेतक इलेक्ट्रिक स्कूटर निर्यात केल्या असून कंपनीच्या निर्यातीत तब्बल 2,194 टक्के इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे एथर एनर्जीने 3,573 स्कूटर निर्यात करत निर्यातीत 23 टक्के वाटा मिळवला आहे. एथरच्या या निर्यातीत 450 सीरिज आणि रिझ्टा या दोन मॉडेल्सचा समावेश आहे.
टीव्हीएस, बजाज आणि एथर या तीन कंपन्यांचा मिळून इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत तब्बल 98 टक्के वाटा आहे. याशिवाय इतर कंपन्यांनीही या निर्यातीत काही वाटा उचलला आहे. ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीने 169, हिरो मोटोकॉर्पने 135, रिव्हर मोबिलिटीने 18 आणि होंडाने अवघ्या 3 इलेक्ट्रिक स्कूटर परदेशात पाठवल्या.
एकट्या ऑगस्ट महिन्यात 3,575 इलेक्ट्रिक स्कूटरची निर्यात झाली, जी मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 209 टक्के जास्त आहे. सध्याचा हा वेग असाच कायम राहिला तर FY2027 या संपूर्ण आर्थिक वर्षात भारताची इलेक्ट्रिक स्कूटर निर्यात 35,000 युनिट्सचा टप्पा ओलांडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.