गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:58 IST

अंतराळात जाणार स्कॉच व्हिस्की: 'स्पेस पफिन' क्यूबसॅटवर लाकडाच्या संपर्कात होणार प्रयोग

स्कॉटलंड आणि जपानमधील संशोधक 2028 मध्ये क्यूबसॅटमधून व्हिस्कीचे नमुने अंतराळात पाठवणार आहेत. मायक्रोग्रॅव्हिटी आणि तापमानातील बदलांचा व्हिस्कीच्या एजिंगवर काय परिणाम होतो, ते तपासले जाईल.

अंतराळात जाणार स्कॉच व्हिस्की: 'स्पेस पफिन' क्यूबसॅटवर लाकडाच्या संपर्कात होणार प्रयोग छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अंतराळ म्हटलं की उपग्रह, टेलिस्कोप आणि परग्रहावरच्या जीवनाचा शोध डोळ्यांसमोर येतो. पण यावेळी वैज्ञानिकांनी वेगळाच प्रयोग हाती घेतला आहे. स्कॉटलंड आणि जपानमधील संशोधक अंतराळातल्या अवघड वातावरणात स्कॉच व्हिस्कीचे नमुने पाठवणार आहेत. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) आणि तापमानातले तीव्र बदल यांचा व्हिस्कीच्या 'एजिंग' प्रक्रियेवर काय परिणाम होतो, हे या प्रयोगातून पाहिले जाणार आहे.

या प्रकल्पाचं नाव 'स्पेस पफिन' (Space Puffin) असं ठेवण्यात आलं आहे. ही मोहीम 2028 मध्ये प्रस्तावित आहे. त्यात एक छोटा क्यूबसॅट अंतराळात पाठवला जाईल. या उपग्रहात व्हिस्कीचे छोटे नमुने ठेवले जातील, तसंच व्हिस्की बनवताना वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे नमुनेही असतील.

ग्लासगो विद्यापीठातील डॉ. गाइल्स बैलेट यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे. स्कॉटलंड आणि जपानमधले अभियंते, रसायनशास्त्रज्ञ आणि विद्यार्थी यात सहभागी आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 2028 मध्ये स्पेसएक्सच्या कार्गो सप्लाय मिशनमधून हा क्यूबसॅट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत (ISS) नेण्याची योजना आहे. तिथून जपानी एक्सपेरिमेंट मॉड्यूलमार्फत तो पृथ्वीच्या कक्षेत सोडला जाईल. सुमारे पाच वर्षे हा उपग्रह पृथ्वीभोवती फिरत राहील आणि त्या काळात व्हिस्कीवरचा प्रयोग सुरू ठेवेल.

पृथ्वीवर व्हिस्की पक्की होण्यासाठी ती अनेक वर्षे ओकच्या लाकडी पिंपांमध्ये ठेवली जाते. या काळात लाकूड आणि स्पिरिट यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडते आणि त्यातून व्हिस्कीला खास रंग, चव आणि सुगंध मिळतो.

अंतराळात मोठे, जड पिंप पाठवणं तांत्रिक आणि पैशाच्या दृष्टीनेही अवघड आहे. म्हणून संशोधकांनी वेगळा मार्ग निवडला आहे. क्यूबसॅटमध्ये एक खास चेंबर तयार केला जाईल. त्यात थोडंसं स्पिरिट ओकच्या लाकडाच्या लहान तुकड्यांच्या संपर्कात ठेवलं जाईल.

क्यूबसॅट सुमारे 90 मिनिटांत पृथ्वीला एक फेरी पूर्ण करतो. त्यामुळे त्याला अंतराळातील खूप वेगवेगळ्या तापमानांचा सामना करावा लागेल. या बदलांमुळे लाकूड झपाट्याने आकुंचन-प्रसरण पावू शकतं. त्यामुळे लाकूड आणि व्हिस्की यांच्यातली रासायनिक प्रक्रिया वेगाने होते का, याचा अभ्यास केला जाईल.

प्रयोगामागचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे. पृथ्वीवर व्हिस्की पक्की व्हायला अनेक वर्षे लागतात. अंतराळातल्या परिस्थितीमुळे ही प्रक्रिया वेगवान होत असेल, तर भविष्यात कमी वेळात ठराविक चव आणि सुगंध असलेली व्हिस्की बनवण्याचा रस्ता खुला होऊ शकतो. डॉ. गाइल्स बैलेट यांच्या मते, अंतराळातील बदलांचा लाकडावर काय परिणाम होतो आणि त्यामुळे व्हिस्कीच्या एजिंगमध्ये काय फरक पडतो, हे समजून घेणं हा प्रयोगाचा मुख्य उद्देश आहे.

हा फक्त व्हिस्की अंतराळात पाठवण्याचा प्रयोग नाही, तर अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन प्रकल्प आहे. क्यूबसॅटमध्ये बसवलेले सेन्सर्स व्हिस्कीच्या रंगातले बदल, तिची रासायनिक रचना आणि आण्विक पातळीवरचे बदल तपासतील. यातून मिळणारा डेटा पृथ्वीवरील संशोधन केंद्रांकडे पाठवला जाईल.

या संशोधनामुळे व्हिस्की पक्की होण्यामागची रासायनिक प्रक्रिया जास्त चांगली समजू शकेल. तसंच भविष्यात अंतराळातील वातावरणात पक्की केलेल्या व्हिस्कीची वेगळी, प्रीमियम श्रेणी तयार होण्याची शक्यताही संशोधक व्यक्त करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ