रब्बी योसेफ मिझराही यांच्या गाय आणि गोमूत्राबाबतच्या विधानांवरून भारत व इस्रायलमध्ये संताप
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अमेरिकन-इस्त्रायली ज्यू धर्मगुरू योसेफ मिझराही यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे हिंदू धर्म आणि भारतीय परंपरांवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
अमेरिकन-इस्त्रायली ज्यू धर्मगुरू (रब्बी) योसेफ मिझराही यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे नवा आंतरराष्ट्रीय वाद पेटला आहे. या व्हिडिओत मिझराही यांनी हिंदू धर्म आणि भारतीय परंपरांबद्दल अपमानजनक विधाने केली आहेत. पवित्र मानल्या जाणाऱ्या गोमातेबद्दल आणि हिंदू धार्मिक प्रथांबद्दल त्यांनी खिल्ली उडवल्याचे या व्हिडिओत दिसते. त्यामुळे भारतातच नाही, तर इस्रायलसह जगातल्या अनेक देशांतल्या लोकांमध्ये तीव्र संताप आहे. ज्यू समुदायातल्या अनेक सदस्यांनीही या विधानांचा निषेध केला आहे. धर्मगुरूचे हे वागणे असभ्य आणि आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इंटरनेटवर वेगाने पसरत असलेल्या या व्हिडिओमध्ये मिझराही हिंदू धर्म आणि भारतीय जीवनशैलीबद्दल बोलताना दिसतात. भारतातली अनेक कुटुंबे गायींना घरातल्या दिवाणखान्यात (Living Room) बांधून ठेवतात आणि गाय लघवी करते तेव्हा ती फरशी चाटतात, असा दावा त्यांनी केला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. भारतीय डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवस्थेचीही त्यांनी उघडपणे टवाळी केली. न्यू दिल्लीतल्या रुग्णालयांत रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आदल्या रात्री गोमूत्र प्यायलेले असण्याची शक्यता असते, असे अपमानास्पद विधान त्यांनी केले.
आपल्या भाषणात मिझराही यांनी "देवाचे आभार की माझी निर्मिती भारतीयांसारखी झाली नाही" असेही म्हटले. त्यातून त्यांनी वांशिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका होत आहे. भारतातल्या एका व्यक्तीचा उल्लेखही त्यांनी केला. ती व्यक्ती त्यांच्या फेसबुक पेजवर काम करत होती आणि ज्यू धर्मात धर्मांतर करू इच्छित होती. कोणत्याही धर्माचा मूळ गाभा असलेल्या सहिष्णुता आणि आदराला हरताळ फासणारे हे वक्तव्य असल्याने जगभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
या विधानांना सर्वात आधी आणि तीव्र विरोध इस्रायलमधूनच झाला. प्रसिद्ध इस्रायली लेखक आणि संशोधक येशाया रोझेनमन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. रोझेनमन काही काळ भारतात राहून अभ्यास करून गेले आहेत, त्यामुळे त्यांना भारतीय संस्कृतीची जवळून ओळख आहे. अशा बेजबाबदार वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलच्या प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रोझेनमन यांच्या मते, मिझराही यांना वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा जुना इतिहास आहे. यापूर्वी त्यांनी ख्रिश्चन, मुस्लिम आणि ऑटिझम (मंदबुद्धी) असलेल्या मुलांबद्दलही असंवेदनशील टिप्पणी केली होती.
भारतातले पॅलेस्टिनी राजदूत अब्दुल्ला एम. अबू शावेश यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. कोणाचेही थेट नाव न घेता त्यांनी म्हटले की, दुसऱ्याच्या धार्मिक परंपरांची थट्टा करणे आणि त्यांचा अनादर करणे म्हणजे थेट मानवी मूल्यांवर हल्ला करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा वांशिक द्वेष (Racism) संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत धोकादायक आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
व्हिडिओ समोर आल्यानंतर X (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युझर्सचा राग उफाळून आला. भारतीय तसेच अनेक इस्रायली नागरिकांनी मिझराही यांच्यावर सडकून टीका केली. बहुतांश लोकांचे मत असे होते की धर्मगुरू असणे म्हणजे दुसऱ्या धर्माचा अपमान करण्याचा परवाना नव्हे. काही युझर्सनी मिझराही यांच्या इस्रायलमधल्या प्रवेशावर कायमची बंदी घालावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. X वर रोमन बिष्ट नावाच्या एका युझरने लिहिले, "हत्ती आपल्या मार्गाने चालत राहतो, तर कुत्रे भुंकत राहतात; मिझराही यांनी स्वतःची लाज वाटून घेतली पाहिजे."
भारतातल्या ज्यू समुदायाला दोन हजार वर्षांहून अधिक काळाचा सुरक्षित आणि समृद्ध इतिहास लाभला आहे. भारतात सुमारे ५ हजारांहून अधिक ज्यू नागरिक गुण्यागोविंदाने आणि आदराने राहतात. ज्यू समुदायाला वांशिक किंवा धार्मिक छळाला कधीही सामोरे जावे लागले नाही, अशा जगातल्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. एका माथेफिरू धर्मगुरूच्या वक्तव्यामुळे भारत आणि इस्रायलच्या ऐतिहासिक व कौटुंबिक संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, तरीही या घटनेवरून सोशल मीडियावर नवा आंतरराष्ट्रीय वाद पेटला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.