ऑक्टोबर २०२६ मध्ये विविध राज्यांत बँका १५ दिवस बंद, RBI ची सुट्ट्यांची यादी जारी
दसरा, दुर्गा पूजा, लक्ष्मीपूजन असे सण आणि शनिवार-रविवार धरून ऑक्टोबरमध्ये बँकांचे कामकाज अनेक दिवस बंद राहील, पण ऑनलाइन सेवा सुरू राहतील.
देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. गणेशोत्सवानंतर आता ऑक्टोबर महिन्यात दसरा, छठ पूजा, दुर्गा पूजा असे अनेक सण एकापाठोपाठ येत आहेत. सणांचा काळ म्हणजे सुट्ट्यांचा काळ, त्यामुळे या महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या आहेत. याचा बँकेच्या कामांवर मोठा परिणाम होणार आहे. तुमचं बँकेत काही काम असेल, तर आधी सुट्ट्यांची यादी बघून मगच नियोजन करा.
RBI ने ऑक्टोबर २०२६ मधील सुट्ट्यांची यादी नुकतीच जारी केली आहे. अनेक राज्यांमध्ये या महिन्यात एकापेक्षा जास्त दिवस बँका बंद असतील. सगळ्या राज्यांचा एकत्र विचार केला, तर बँका १५ दिवस बंद राहतील. महात्मा गांधी जयंती, महालय अमावस्या, महा सप्तमी, दसरा (महाअष्टमी)/महानवमी/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजयादशमी/दुर्गा अष्टमी, दसरा (विजयादशमी), महानवमी, आयुधा पूजा/विजय पूजा यांसारख्या सणांमुळे या सुट्ट्या आहेत. लक्ष्मीपूजन, करवा चौथ आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती यांचाही त्यात समावेश आहे.
भारतात सर्व बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. बँक कर्मचारी बऱ्याच काळापासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी करत आहेत. एका प्रमुख बँक कर्मचारी संघटनेने या मुद्द्यावरून २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान संपाची हाक दिली होती, पण शेवटच्या क्षणी तो पुढे ढकलण्यात आला.
सुट्ट्यांच्या काळातही ऑनलाइन बँकिंग सेवा उपलब्ध राहतील. ग्राहक ऑनलाइन बँकिंग, स्मार्टफोन ॲप आणि UPI आधारित पेमेंट वापरून घरबसल्या बहुतेक कामं करू शकतात. पैसे पाठवणं, बिल भरणं आणि खात्याचं व्यवस्थापन सुट्टीतही लगेच करता येतं. मात्र काही कामांसाठी शाखेत जावं लागू शकतं, म्हणून आधी ही यादी तपासा.
२ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधी जयंतीमुळे बँका बंद राहतील. ही राष्ट्रीय सुट्टी असल्याने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत बँका बंद असतील. ४ ऑक्टोबर, १८ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील. १० ऑक्टोबरला महिन्याचा दुसरा शनिवार आणि २४ ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने त्या दिवशीही देशभरात बँका बंद असतील.
१७ ऑक्टोबर २०२६ रोजी महासप्तमीनिमित्त त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी त्रिपुरा, मिझोराम, ओडिशा, तामिळनाडू, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि मेघालयमध्ये दसरा (महाष्टमी)/महानवमी/आयुथा पूजा/दुर्गा पूजा/अष्टमी निमित्त बँका बंद राहतील. २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसरा/विजयादशमी/महानवमी/आयुधपूजा/दुर्गापूजेमुळे मणिपूर आणि सिक्कीम वगळता सर्व राज्यांत बँका बंद आहेत.
२१ ऑक्टोबर २०२६ रोजी विजयादशमी/दुर्गा पूजा (दासीन) निमित्त त्रिपुरा, कर्नाटक, सिक्कीम, आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद आहेत. २२ आणि २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुर्गा पूजा (दासीन) निमित्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
२६ ऑक्टोबर २०२६ रोजी लक्ष्मी पूजा/विलिनीकरण दिन/महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त त्रिपुरा, चंदीगड, जम्मू आणि श्रीनगर, तसेच हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी करवा चौथनिमित्त हिमाचल प्रदेशमध्ये आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये बँका बंद राहतील.