ऑक्टोबरमध्ये सणांची रेलचेल; शाळा तब्बल 11 दिवस बंद राहण्याची शक्यता
गांधी जयंती, घटस्थापना आणि दसरा यांसह साप्ताहिक सुट्ट्या धरल्यास ऑक्टोबर 2026 मध्ये काही शाळांना 11 दिवसांपर्यंत सुट्टी मिळू शकते.
यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात विविध सण-उत्सव येत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसणार आहे. या महिन्यात सणवारांची रेलचेल आहे. त्यामुळे शाळेतला अभ्यास आणि गृहपाठाचे टेन्शन काही दिवस बाजूला ठेवून मुलांना हवीहवीशी विश्रांती मिळणार आहे. शाळांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्याही असणार आहेत, म्हणून हा ऑक्टोबर महिना विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
सण-उत्सवांच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारची साप्ताहिक सुट्टी धरली, तर शाळा तब्बल 11 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. गांधी जयंती, घटस्थापना, नवरात्रोत्सव आणि दसरा हे सगळे ऑक्टोबर महिन्यातच आहेत. त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या सुट्ट्यांचे नियोजन आधीपासूनच करणे सोयीचे ठरणार आहे.
ऑक्टोबरमधल्या सुट्ट्यांचे संभाव्य वेळापत्रक असे आहे. 2 ऑक्टोबर 2026 ला शुक्रवार असून त्या दिवशी महात्मा गांधी जयंतीची राष्ट्रीय सुट्टी आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2026 (शनिवार) आणि 4 ऑक्टोबर 2026 (रविवार) हे दोन्ही दिवस साप्ताहिक सुट्टीचे आहेत.
पुढे 10 ऑक्टोबर 2026 ला शनिवार असल्याने साप्ताहिक सुट्टी आहे. 11 ऑक्टोबर 2026 ला रविवार असून त्या दिवशी घटस्थापनाही आहे, तसेच साप्ताहिक सुट्टीही आहे. मग 17 ऑक्टोबर (शनिवार) आणि 18 ऑक्टोबर (रविवार) या दोन्ही दिवशी साप्ताहिक सुट्टी आहे.
20 ऑक्टोबर 2026 रोजी दसरा, म्हणजेच विजयादशमी आहे आणि त्या दिवशी दसऱ्याची सुट्टी असेल. पुढे 24 ऑक्टोबर (शनिवार) आणि 25 ऑक्टोबर (रविवार) ला साप्ताहिक सुट्टी आहे. महिन्याच्या शेवटी 31 ऑक्टोबर 2026 ला शनिवार असल्याने त्या दिवशीही साप्ताहिक सुट्टी आहे.
सगळ्याच शाळांना सारख्याच सुट्ट्या नसतात. काही शाळांमध्ये शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस सुट्टी असते, तर काही ठिकाणी फक्त रविवारीच शाळा बंद असते. ज्या शाळांमध्ये दोन्ही दिवस सुट्टी असते, तिथे सणांच्या सुट्ट्यांची जोड मिळाल्यास एकूण सुट्ट्यांचा आकडा 11 दिवसांपर्यंत जाऊ शकतो.
या महिन्यात शनिवार आणि रविवारच्या नेहमीच्या साप्ताहिक सुट्ट्यांसोबत अनेक मोठे सण आल्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच चांदी होणार आहे. एवढी दीर्घ विश्रांती मिळाल्याने विद्यार्थ्यांना कुटुंबासोबत वेळ घालवायला आणि सणांचा आनंद घ्यायला उत्तम संधी मिळणार आहे.
शाळांच्या सुट्ट्या प्रामुख्याने राज्य आणि तिथल्या बोर्डाच्या नियमांनुसार बदलत असतात. उदाहरणार्थ, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचा उत्साह मोठा असतो, तर तेलंगणात 'बथुकम्मा' सारख्या प्रादेशिक सणांना विशेष महत्त्व असते. या सर्व गोष्टींमुळे वेगवेगळ्या राज्यांत सुट्ट्यांचे वेळापत्रक थोडेफार वेगळे असू शकते.