अकरावीच्या तब्बल ८ लाख ८५ हजार ६४१ जागा रिकाम्या, बारावी विशेष फेरीचे प्रवेश २९ सप्टेंबरपर्यंत
राज्यात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तीन नियमित फेऱ्यांनंतर आता विशेष फेरी सुरू असून २२ लाख ४९ हजार ७९ जागांपैकी ८ लाख ८५ हजार ६४१ जागा रिक्त आहेत.
राज्यातील शैक्षणिक वर्षाचा पहिला टप्पा संपत आला आहे, तरी अकरावीचे प्रवेश अजून सुरूच आहेत. तीन नियमित फेऱ्या झाल्यानंतर विशेष फेऱ्या सुरू आहेत आणि आता बारावी विशेष फेरी जाहीर झाली आहे.
या फेरीचे प्रवेश वाटप झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळाली आहे, त्यांना आज, २९ सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करता येईल. त्यानंतर १ ऑक्टोबरला रिक्त जागा जाहीर केल्या जातील.
राज्यात ९ हजार ७१८ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांच्यात अकरावीच्या एकूण २२ लाख ४९ हजार ७९ जागा आहेत. आतापर्यंत १३ लाख ६३ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे ८ लाख ८५ हजार ६४१ जागा रिकाम्या आहेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या १५ लाख ६२ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी १९ लाख २२ हजार ८२९ जागा आहेत. त्यापैकी ११ लाख ९५ हजार ४०५ जागांवर प्रवेश झाले आहेत आणि ७ लाख २७ हजार ४२४ जागा रिक्त आहेत. कोट्यातील जागा ३ लाख २६ हजार २५० आहेत. त्यापैकी १ लाख ६८ हजार ३३ जागांवर प्रवेश झाले असून १ लाख ५८ हजार २१७ जागा रिक्त आहेत.
अकरावी प्रवेशापासून कोणी वंचित राहू नये, म्हणून २५, २६ आणि २७ तारखेला विद्यार्थ्यांना संदेश पाठवण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजून प्रवेश घेतला नाही, त्यांनी तो घ्यावा. यावेळी प्रवेश घेतला नाही, तर विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.
अंतिम विशेष फेरीचे वेळापत्रक असे आहे. प्रवेश निश्चिती २८ ते २९ सप्टेंबर या काळात दुपारी ३ ते आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येईल. ३० सप्टेंबरचा दिवस कनिष्ठ महाविद्यालयांच्या कामकाजासाठी राखीव आहे. १ ऑक्टोबरला डाटा प्रोसेसिंग होईल आणि त्याच दिवशी दुपारी ४ वाजता रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील.