अकोल्यात जप्त केलेला ९०० किलो खवा नमुने न घेताच परत; एफडीएला ठावठिकाणा माहीत नाही
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अहमदाबादहून बसने आलेला सुमारे ९०० किलो ते एक टन संशयित खवा सिटी कोतवाली पोलिसांनी जप्त केला होता. अधिकृत हस्तांतरणाशिवाय तो गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांनी रविवारी जप्त केलेला सुमारे ९०० किलो ते एक टन संशयित खवा कोणतीही अधिकृत हस्तांतरण प्रक्रिया न होताच रातोरात गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.
हा खवा अहमदाबादहून एका खासगी लक्झरी बसने अकोल्यातील लक्झरी स्टँडवर आणला गेला होता. स्टँडवर बसमध्ये मोठ्या प्रमाणात खवा असल्याचे वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले. त्यांना तो संशयास्पद वाटला, म्हणून त्यांनी लगेच सिटी कोतवाली पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. तेव्हा खव्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यानंतर तो खवा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला.
काही वेळाने अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) याची माहिती देण्यात आली. एफडीएचे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी खव्याची पाहणी केली. हा खवा संशयास्पद असून त्याचे नमुने घेऊन तपासणी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र त्या दिवशी सुट्टी होती आणि सहाय्यक आयुक्त दे. गो. वीर अकोल्यात नव्हते. त्यामुळे पुढची प्रक्रिया करता येणार नाही, असे सांगण्यात आले. पोलिसांनी खव्याचे अधिकृत हस्तांतरण केलेले नाही, असेही एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अखेर अधिकारी खवा पोलीस स्टेशनमध्येच ठेवून परतले.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे सोमवारी, सिटी कोतवाली पोलिसांनी एफडीए कार्यालयाला एक पत्र दिले. जप्त केलेला खवा मूळ मालकाचा शोध घेऊन अटी व शर्तीवर परत करण्यात आला, असे त्या पत्रात नमूद आहे. पण त्या मालकाचे नाव, पत्ता किंवा संपर्क क्रमांक पत्रात दिलेला नाही. त्यामुळे हा खवा नेमका कोणाला आणि कोणत्या आधारावर परत केला, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
खव्याचे नमुने तपासणीसाठी न घेताच तो परत केल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तपासणी होण्याआधीच खवा परत कसा केला गेला, हा प्रश्न विचारला जात आहे.
याबद्दल सहाय्यक आयुक्त दे. गो. वीर, अन्न व औषध प्रशासन, अकोला यांनी सांगितले की, सिटी कोतवाली पोलिसांनी जप्त केलेल्या खव्याची माहिती दिली होती, पण खवा हस्तांतरित केला नाही. सोमवारी पोलिसांनी दिलेल्या पत्रात जप्त केलेला खवा मूळ मालकाला शोधून अटी व शर्तीवर परत केल्याचे म्हटले आहे. परंतु त्या पत्रात मूळ मालकाचे नाव, पत्ता किंवा त्यासंबंधी इतर कोणतीही माहिती नाही. आज खवा कुठे आहे, याची आमच्या कार्यालयाला काहीच कल्पना नाही, असे वीर यांनी म्हटले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.