मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:40 IST

अकोला आरटीओला १० बॉडीवेअर कॅमेरे; वाहन तपासणीचे चित्रीकरण होणार

अकोला आरटीओ कार्यालयाला १० बॉडीवेअर कॅमेरे मिळाले असून फिरत्या पथकातील अधिकारी वाहन तपासणी आणि कारवाईचे ध्वनिचित्रमुद्रण करणार आहेत.

अकोला आरटीओला १० बॉडीवेअर कॅमेरे; वाहन तपासणीचे चित्रीकरण होणार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

अकोला : राज्य शासनाच्या परिवहन विभागाने कामकाजात पारदर्शकता, सुरक्षितता आणि अचूकता यावी म्हणून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. क्षेत्रीय (फिल्ड) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 'बॉडी वेअरेबल कॅमेरे' देण्यात आले आहेत. रस्त्यावरील वाहतूक अंमलबजावणी, वाहन तपासणी, वाहनचालकांशी होणारा संवाद तसेच परिवहन कार्यालयातील विविध तपासण्या आणि चाचण्या यांचे काम या तंत्रज्ञानामुळे अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह होणार आहे.

अकोला आरटीओ कार्यालयालाही नुकतेच १० बॉडीवेअरेबल कॅमेरे मिळाले आहेत. त्यांचा वापर लवकरच सुरू होणार आहे. हे कॅमेरे ४ मोटार वाहन निरीक्षक आणि २ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्या फिरत्या पथकामार्फत (फ्लाईंग स्क्वॉड) वापरले जाणार आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षण लवकरच पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

या कॅमेऱ्यांमुळे अधिकारी रस्त्यावर करत असलेली वाहन तपासणी, नियम मोडणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाई, वायुवेग पथकाच्या मोहिमा, वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) तपासणी, वाहनांची प्रत्यक्ष पडताळणी आणि वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणी, या सगळ्या प्रक्रियेचे ध्वनिचित्रमुद्रण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कारवाईची वस्तुनिष्ठ नोंद राहील आणि एखाद्या वादाच्या प्रकरणात नेमके काय घडले हे स्पष्ट करायला मदत होईल.

परिवहन विभागाच्या या उपक्रमामुळे अधिकारी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सभ्य, पारदर्शक आणि जबाबदार होईल. कारवाईच्या वेळी दोन्ही बाजूंच्या सुरक्षेची खात्री मिळेल, तसेच गैरसमज, खोट्या तक्रारी किंवा अनावश्यक वाद टाळता येतील. कामकाजातील उत्तरदायित्व वाढल्याने नागरिकांचा परिवहन विभागावरचा विश्वास आणखी दृढ होईल.

डिजिटल रेकॉर्डिंगमुळे प्रत्येक कारवाईचे पुरावे सुरक्षित राहतील. न्यायालयीन किंवा प्रशासकीय चौकशीत या ध्वनिचित्रफितींचा वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून उपयोग होऊ शकेल. याशिवाय अधिकाऱ्यांच्या कामाच्या दर्जाचे मूल्यमापन, प्रशिक्षण आणि सेवा सुधारण्यासाठीही हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

परिवहन विभागाच्या मते, हा उपक्रम फक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नसून नागरिकांनाही न्याय्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे विभागाचे काम अधिक गतिमान, कार्यक्षम आणि उत्तरदायी होण्यास मदत होणार आहे.

अकोल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले की, परिवहन विभागाचा हा निर्णय वाहनचालक, वाहनमालक आणि अधिकारी या सर्वांच्याच हिताचा आहे. बॉडी वेअरेबल कॅमेऱ्यांमुळे कामकाजात पारदर्शकतेची खात्री मिळेल. वाहनचालकांनी गाडी चालवताना सर्व वैध कागदपत्रे जवळ ठेवावीत, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्ता सुरक्षेसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ