राज्यात परतीच्या पावसाचा जोर, पुढील 48 तासांत अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान खात्याने रायगड, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातल्या हवामानात गेल्या काही दिवसांत मोठे बदल होत आहेत. परतीच्या पावसाने आता चांगलाच जोर धरलाय आणि अनेक भागांत मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. तरी काही भागांत अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने तिथले नागरिक पावसाची वाट बघत आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा थेट इशारा दिला असून बाकीच्या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, सातारा, सातारा घाटमाथा, सोलापूर, लातूर, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, पुणे, पुणे घाटमाथा, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मात्र हलक्या सरी पडणार आहेत.
उद्या बुधवारी सुद्धा राज्यातल्या अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती आणि भंडारा या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर जळगाव, धुळे, पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील.
दुसरीकडे नैऋत्य मॉन्सूनच्या परतीची सीमा सध्या जैसलमेर, नागौर, सिकर, रोहतक, पतियाळा आणि गुरुदासपूर या भागात कायम आहे. पण पुढच्या दोन दिवसांत पंजाबचा उर्वरित भाग, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थानचा आणखी काही भाग, तसेच सौराष्ट्र-कच्छ, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांतून मॉन्सून परतीसाठी अनुकूल स्थिती तयार होत आहे.
याशिवाय पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या 6 तासांत 18 किमी प्रति तास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. हे क्षेत्र सध्या ओडिशातील गोपाळपूरपासून सुमारे 200 किमी आग्नेयेला, आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमपासून 200 किमी पूर्व-आग्नेयेला, ओडिशातील पुरीपासून 210 किमी दक्षिणेला आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून 290 किमी पूर्वेला केंद्रित झाले आहे. पुढील 12 तासांत हे क्षेत्र पश्चिम-वायव्येकडे सरकून अधिक तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल आणि त्यानंतर 23 सप्टेंबरच्या रात्री ते 24 सप्टेंबरच्या पहाटेदरम्यान विशाखापट्टणम आणि गोपाळपूरदरम्यान उत्तर आंध्र प्रदेश ते दक्षिण ओडिशाची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.