अर्जुन रामपालच्या '3 Monkeys'ची घोषणा; ४ डिसेंबरला श्रद्धा कपूरच्या 'ईठा'शी बॉक्स ऑफिसवर टक्कर
अब्बास-मस्तान यांच्या दिग्दर्शनाखालील अर्जुन रामपालच्या '3 Monkeys' या थ्रिलर चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज झाले असून हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या आगामी '3 Monkeys' या थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक ज्या सिनेमाची वाट पाहत होते, त्याची अधिकृत घोषणा झाली असून निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टरही रिलीज केले आहे. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अब्बास-मस्तान ही प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. घोषणेनंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 'बाजीगर', 'रेस' आणि 'अजनबी' यांसारख्या थ्रिलर चित्रपटांसाठी अब्बास-मस्तान ओळखले जातात. '3 Monkeys'च्या निमित्ताने ते पुन्हा एकदा थ्रिलर जॉनरमध्ये येत आहेत.
चित्रपटात अर्जुन रामपालसोबत विशाल जेठवा, मुस्तफा बर्मावाला आणि तेन्झिन दलहा महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. विशाल जेठवा 'अमर' ही भूमिका करणार आहे, मुस्तफा बर्मावाला 'अकबर' आणि तेन्झिन दलहा 'अँथनी' साकारणार आहे. अर्जुन रामपाल 'संजय'च्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.
मोशन पोस्टरमध्ये या तीन पात्रांची झलक पाहायला मिळते. मात्र त्यांच्या कथेबद्दल निर्मात्यांनी अजून फारशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे 'अमर-अकबर-अँथनी'ची नेमकी कथा काय आहे, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटातील रहस्य आणि कथानकाबाबत सध्या गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे मोशन पोस्टरनंतर आता ट्रेलर कधी येणार, याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
गांधी जयंतीच्या निमित्ताने '3 Monkeys'ची घोषणा करण्यात आली. मोशन पोस्टरमध्ये प्रसिद्ध 'थ्री मंकीज' संकल्पना नव्या अंदाजात मांडली आहे. 'वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका' या पारंपरिक संदेशाऐवजी चित्रपटात 'सगळं पाहा, स्वतःचं ऐका आणि निर्भयपणे बोला' अशी नवी टॅगलाइन दिसते. अब्बास-मस्तान यांनी या तीन पात्रांना आजच्या पिढीच्या विचारसरणीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे, याच ४ डिसेंबर २०२६ रोजी श्रद्धा कपूर यांची भूमिका असलेला 'ईठा' हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे. अर्जुन रामपालचा थ्रिलर आणि श्रद्धा कपूरचा 'ईठा' यांपैकी प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला जास्त पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.