वायरलेस एफएम आणि 1.77 इंच कलर डिस्प्लेसह नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांपेक्षा कमी
Itel कंपनीने आपला लेटेस्ट फीचर फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. ACE 4 Shine असे या नव्या फोनचे नाव असून त्याची किंमत 1,059 रुपये ठेवण्यात आली आहे, म्हणजे 2 हजार रुपयांपेक्षाही कमी. हा फोन ब्लॅक, मॅजिक ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन अशा तीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. फिजिकल कीबोर्ड आणि ड्यूल सिम सपोर्ट हे या फोनचे खास वैशिष्ट्य आहे.
कंपनीने दावा केला आहे की, एकदा फुल चार्ज केल्यावर हा फोन 8 दिवसांचा बॅकअप देतो आणि 8.3 तासांचा टॉक टाइम ऑफर करतो. म्हणजेच एकदा चार्जिंग केल्यावर हा फोन अनेक दिवस चालू शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
डिस्प्लेबाबत बोलायचे झाले तर या फोनमध्ये 1.77-इंचाचा क्यूक्यूव्हीजीए कलर डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 128x160 पिक्सेल इतके आहे. फोनला कर्व्ड बॉडी, टेक्स्चर फिनिश आणि रेडिएंट कीपॅड मिळाला आहे. शिवाय लार्ज-फ्रंट डायलरही या फोनमध्ये पाहायला मिळतो, ज्यामुळे फोनचा लूक वेगळा दिसतो. बॅटरीबाबत सांगायचे तर यात 1000mAh ची बॅटरी असून चार्जिंगसाठी टाईप-सी पोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी ड्यूल सिम आणि 900/1800MHz बँडचा 2G नेटवर्क सपोर्ट या फोनमध्ये मिळतो.
या फोनमध्ये ब्लूटूथ आणि वायरलेस एफएम सोबतच रेकॉर्डिंगची सुविधा आणि 3.5mm हेडफोन जॅकही देण्यात आला आहे. हिंदी, गुजराती, तेलुगू, पंजाबी, कन्नड, मल्याळम आणि बंगाली यांसारख्या भारतीय भाषांचा सपोर्टही या फोनला मिळतो, त्यामुळे देशभरातील वेगवेगळ्या भाषिक यूजर्सना हा फोन वापरता येईल. याशिवाय ऑटो रेकॉर्डिंगसह एसओएस फीचरही या फोनमध्ये देण्यात आले आहे. यूजर्स या फोनमध्ये फोटोसह 500 कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकतात.
आयटेलच्या या लेटेस्ट फीचर फोनमध्ये यूनिसोक SC6533G प्रोसेसर बसवण्यात आला आहे. फोनला 4MB रॅम आणि 8MB स्टोरेज मिळते, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 32 जीबीपर्यंत वाढवता येते. यामुळे यूजर्सना फोनमध्ये जास्त डेटा साठवण्याची सोय मिळते. यासोबतच म्यूजिक आणि व्हिडीओ प्लेयर, एफएम, फाइल मॅनेजर, कॅलेंडर, अलार्म, कॅलकुलेशन, टॉर्च आणि कार्लकेयर हे फीचरही या फोनमध्ये देण्यात आले आहेत.