फोल्डेबल फोन घ्यायचाय पण बजेट कमी? आयफोन डुओपेक्षा स्वस्त असलेले 4 पर्याय
ॲपलच्या 2,99,900 रुपयांच्या आयफोन डुओला टक्कर देणारे गूगल, सैमसंग आणि मोटोरोलाचे स्वस्त फोल्डेबल फोन कोणते, जाणून घ्या फीचर्ससह.
टेक कंपनी ॲपलने नुकताच त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन बाजारात आणला आहे. आयफोन डुओ या नावाने लाँच झालेल्या या डिव्हाईसची किंमत 2,99,900 रुपये इतकी आहे, त्यामुळे हा फोन सध्या बाजारातील सर्वात महागड्या स्मार्टफोन्सपैकी एक ठरला आहे. मात्र फोल्डेबल फोन घ्यायची इच्छा असूनही बजेट कमी असणाऱ्यांसाठी काळजी करण्याचे कारण नाही, कारण बाजारात यापेक्षा स्वस्त किंमतीत गूगल, सैमसंग आणि मोटोरोलाचे फोल्डेबल पर्याय उपलब्ध आहेत.
यातील पहिला पर्याय म्हणजे गूगल पिक्सेल 11 प्रो फोल्ड. या फोनची सुरुवातीची किंमत 1,86,999 रुपये आहे. यात टेंसर G6 प्रोसेसर आणि 16GB रॅम देण्यात आली असून, 6.5 इंचाची कवर स्क्रीन आणि 8 इंचाचा इनर डिस्प्ले मिळतो. स्प्लिट स्क्रीन, ड्रॅग अँड ड्रॉप आणि इंस्टंट व्ह्यु यांसारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत. शिवाय पिक्सेल सिरीजचे एआय आणि कॅमेरा फीचर्सही यात मिळणार आहेत.
आयफोन डुओला थेट टक्कर देणारा दुसरा फोन म्हणजे सैमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8, ज्याची सुरुवातीची किंमत 1,84,999 रुपये आहे. यात 5.5 इंचाची कवर डिस्प्ले आणि 7.6 इंचाची इनर स्क्रीन आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 फॉर गॅलेक्सी हा प्रोसेसर, 12GB रॅम आणि 4,800mAh बॅटरी हे यातील ठळक स्पेसिफिकेशन्स आहेत. या फोनचे बुक-स्टाइल फोल्डिंग डिझाईन मल्टीटास्किंग, अभ्यास आणि व्हिडीओ पाहण्यासाठी मोठी स्क्रीन देते.
याहून आणखी कमी बजेट असणाऱ्यांसाठी मोटोरोला रेझर फोल्ड हा पर्याय आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 1,49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यात 6.6 इंचाची बाहेरील स्क्रीन, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा सेटअप हे या फोनचे खास वैशिष्ट्य आहे. मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि दमदार कॅमेरा हार्डवेअर हवे असणाऱ्यांसाठी हा फोन उत्तम पर्याय ठरू शकतो.
बजेट आणखी कमी असेल तर मोटोरोला रेझर अल्ट्रा (2026) हा फोन घेण्याचा विचार करता येईल. याची किंमत 1,499 डॉलर म्हणजेच सुमारे 1,42,500 रुपये आहे. फ्लिप डिझाईनमध्ये उपलब्ध असणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलाईट चिप, 16GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. इतर फोल्डेबल फोनच्या तुलनेत याचे कॉम्पॅक्ट डिझाईन जास्त पोर्टेबल ठरते.