गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

अर्मेनियाच्या संसदेत सत्ताधारी व विरोधी खासदारांत लाथाबुक्क्यांची हाणामारी, सभागृह तहकूब

अर्मेनियाच्या संसदेत सत्ताधारी व विरोधी खासदारांत लाथाबुक्क्यांची हाणामारी, सभागृह तहकूब छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जग PT24 टीम

अर्मेनियाच्या नॅशनल असेंब्लीत सत्ताधारी आणि विरोधी खासदार एकमेकांशी भिडले. काही खासदार जखमी झाले आणि कामकाज काही काळ थांबवावे लागले.

अर्मेनियाच्या नॅशनल असेंब्लीत म्हणजेच संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार सभागृहातच एकमेकांना भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. जोरदार वादानंतर सभागृहात तुंबळ हाणामारी झाली. खासदार एकमेकांवर तुटून पडले आणि सभागृहाला रणांगणाचे स्वरूप आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, या हिंसक प्रकारावर जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पार्टी (Civil Contract Party) आणि विरोधी पक्षाचे खासदार यांच्यात आधीपासूनच राजकीय तणाव होता. ताज्या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाचे खासदार तारोन चखोयान (Taron Chakhoyan) भाषण करायला उभे राहिले आणि अचानक परिस्थिती चिघळली. त्यांनी केलेल्या एका अपमानास्पद आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधी खासदार कमालीचे संतापले.

सभागृहाचे कामकाज सुरू असताना चखोयान यांनी विरोधी पक्षाला लक्ष्य करत काही तीव्र शब्दांत टीका केली. त्यावर विरोधी स्ट्रॉंग अर्मेनिया पार्टीचे (Strong Armenia Party) नेते नरेक करापेट्यान (Narek Karapetyan) यांनी जागेवरूनच जोरदार आक्षेप घेतला आणि ते ओरडू लागले. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

पाहता पाहता या शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. विरोधी पक्षाचे इतर खासदारही अध्यक्षांच्या व्यासपीठाच्या दिशेने धावले आणि सत्ताधारी खासदारांशी भिडले. खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओत खासदार एकमेकांवर तुटून पडताना आणि काही खासदार जमिनीवर कोसळताना स्पष्ट दिसत आहेत.

हिंसाचार उफाळल्यानंतरही सुरुवातीला कामकाज थांबवले गेले नाही. संसदेचे उपाध्यक्ष रुबेन रुब्यान (Ruben Rubinyan) यांनी थेट भूमिका घेत म्हटले, "मी हे अधिवेशन मुद्दाम थांबवणार नाही, जेणेकरून सर्वांना ही परिस्थिती दिसेल. अधिवेशन सुरूच राहील, हिंसा करायची की शांतपणे बसायचे हे तुमचे तुम्ही ठरवा!"

मात्र परिस्थिती क्षणाक्षणाला अधिक बिघडत गेली आणि काही खासदारांना तोंडावर व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या. कॉरिडॉर आणि सभागृहातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकांनी (मार्शल्स) सभागृहात धाव घेतली आणि दोन्ही गटांच्या खासदारांना एकमेकांपासून दूर केले. त्यानंतर उपाध्यक्षांनी कामकाज काही काळासाठी तहकूब केल्याचे जाहीर केले.

अर्मेनियाच्या संसदेत असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट आणि स्ट्रॉंग अर्मेनिया पक्षांच्या खासदारांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप आणि वक्तव्यांवरून अशीच हाणामारी झाली होती. देशांतर्गत राजकीय घडामोडी आणि सीमावर्ती मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत तीव्र मतभेद दिसत आहेत.

या ताज्या घटनेनंतर अर्मेनियातील मानवाधिकार संघटना आणि आमदारांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. संसदेसारख्या सर्वोच्च ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्मेनियाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

#नागपूर#दुनिया#PT24#World#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ