शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

गोरेगावच्या महाविद्यालयात 'आपल्या मतदानाच्या अधिकारांची माहिती जाणून घ्या' संकल्पनेवर विकसित भारत युवा संवाद

गोरेगावच्या महाविद्यालयात 'आपल्या मतदानाच्या अधिकारांची माहिती जाणून घ्या' संकल्पनेवर विकसित भारत युवा संवाद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील जगत कला व वाणिज्य महाविद्यालयात तरुणांना मतदानाच्या अधिकारांची माहिती देण्यासाठी विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम झाला.

गोंदिया, दि. ५ : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील जगत कला व वाणिज्य महाविद्यालयात विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम झाला. मेरा युवा भारत, गोंदिया आणि भारत सरकारचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'आपल्या मतदानाच्या अधिकारांची माहिती जाणून घ्या' (Know Your Vote) ही त्याची मध्यवर्ती संकल्पना होती. या संकल्पनेतून तरुणांना मतदानाच्या अधिकारांची जाणीव करून द्यायची आणि लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढवायचा, यावर कार्यक्रमात भर देण्यात आला.

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी नामनिर्देशित केलेले युवा आयकॉन अमन भंडारकर यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा लोकशाही अधिकार आहे. त्याचा नीट वापर करून तरुणांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) या प्रक्रियेची सविस्तर माहितीही त्यांनी दिली. मतदार यादीच्या पुनरीक्षणाचे महत्त्व, त्यामागचा उद्देश आणि त्याची गरज त्यांनी स्पष्ट करून सांगितली. या प्रक्रियेबद्दल समाजमाध्यमांवर किंवा इतर माध्यमांतून पसरणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका, अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्या, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मेरा युवा भारतचे उपसंचालक सौरभ कुमार निषाद यांनी कार्यक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितली. लोकशाही व्यवस्थेत आपली भूमिका काय आहे हे तरुणांनी ओळखावे आणि मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य नीलकंठ लंजे यांनी उपस्थितांना लोकशाहीची शपथ दिली. लोकशाही मूल्ये जपण्यासाठी प्रत्येकाने मतदानाबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे, असे सांगून त्यांनी तरुणांना जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक बबन मेश्राम यांनीही उपस्थितांना संबोधित केले. तरुणांनी सामाजिक आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी क्षयरोग समुपदेशक प्रज्ञा कांबळे यांनी क्षयरोगाची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ग्राम हिरडामाली येथे जनजागृतीचे काम करत आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ललिता धवाले यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कैलास जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ