शाळेतील हल्ल्यानंतर चित्रपटांवर टीका, राम गोपाल वर्मा यांचे उत्तर
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आंध्र प्रदेशातील शाळेत विद्यार्थिनीवर चेन सॉने हल्ला झाल्यानंतर चित्रपटांमधील हिंसाचाराची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राम गोपाल वर्मा यांनी एक्सवर भूमिका मांडली.
आंध्र प्रदेशातील एका शाळेत विद्यार्थिनीवर चेन सॉने (इलेक्ट्रिक करवत) हल्ला झाला. या धक्कादायक घटनेनंतर चित्रपटांमधील हिंसाचाराचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटांमधील हिंसक दृश्यांवर होणाऱ्या टीकेला चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी उत्तर दिले आहे. समाजात हिंसाचार वाढतोय म्हणून चित्रपटांना जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी मांडले.
राम गोपाल वर्मा यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर आपली भूमिका मांडली. हिंसाचार वाढला म्हणून चित्रपटांना दोष देणे म्हणजे अपहरणाच्या घटना वाढल्या म्हणून रामायणाला दोष देण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान वादग्रस्त ठरले आहे.
घटना आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील रापताडू येथे घडली. एक तरुण शाळेच्या वर्गात घुसला आणि त्याने विद्यार्थिनीवर चेन सॉने हल्ला केला. हेमंत नावाचा हा तरुण २१ वर्षांचा आहे. हल्ल्यात जखमी झालेली विद्यार्थिनी १५ वर्षांची असून ती दहावीत शिकते. तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना तिची मैत्रीणही जखमी झाली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी या विद्यार्थिनीचा बऱ्याच काळापासून पाठलाग करत होता. त्याने प्रेमाचा प्रस्ताव दिला होता, तो विद्यार्थिनीने नाकारला. त्यामुळे त्याने हा हल्ला केला, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जखमी विद्यार्थिनीवर बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला आणि त्याला धर्मावरम येथे ताब्यात घेण्यात आले.
या घटनेनंतर सोशल मीडियावर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'ॲनिमल' चित्रपटाची चर्चा सुरू झाली. या चित्रपटात रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. एका दृश्यात तो हातात भरलेली बंदूक घेऊन शाळेच्या वर्गात शिरताना दिसतो. त्या दृश्यावरून नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
चित्रपटांमधील हिंसक दृश्यांचा तरुणांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हिंसाचाराचे उदात्तीकरण केले म्हणून निर्माते आणि कलाकारांना जबाबदार धरावे, अशी मागणी काही नेटकऱ्यांनी केली. एका युजरने चित्रपटांमधील हिंसा आणि अपप्रचार यांबद्दल यापूर्वी उपस्थित झालेल्या प्रश्नांचा उल्लेख केला. अशा दृश्यांच्या परिणामांवर गंभीर चर्चा व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले. दुसऱ्या युजरने 'ॲनिमल'मधील वर्गात बंदूक घेऊन जाण्याच्या दृश्याचा संदर्भ देत चित्रपट निर्मात्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
राम गोपाल वर्मा हे संदीप रेड्डी वांगा यांचे चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वीही सार्वजनिक व्यासपीठांवर संदीप यांच्या चित्रपट निर्मितीच्या शैलीचे आणि कामाचे कौतुक केले आहे. संदीप रेड्डी वांगा हेही राम गोपाल वर्मा यांना आपला आदर्श मानतात. शाळेतील या हल्ल्यामुळे चित्रपटांमधील हिंसाचार आणि त्याचा समाजावर होणारा संभाव्य परिणाम हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.