सोमवार, 2 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

केवडियात मोदींनी पाहिल्या पैठणी साड्या; महाराष्ट्राच्या पर्यटन दालनाला भेट

केवडियात मोदींनी पाहिल्या पैठणी साड्या; महाराष्ट्राच्या पर्यटन दालनाला भेट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व 2026 निमित्त केवडिया (एकतानगर) येथील महाराष्ट्र पर्यटन दालनात पंतप्रधानांनी हातमागावरील पैठणीची माहिती घेतली.

गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व 2026 निमित्त सुरू असलेल्या उपक्रमात महाराष्ट्राचे खास पर्यटन दालन उभारले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दालनाला भेट दिली. महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे दालन उभे केले आहे.

भेटीत मोदी यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक हातमागावर विणलेल्या देखण्या पैठणी साड्या पाहिल्या. पैठणी विणताना होणारी कलाकुसर, त्यामागचे पारंपरिक तंत्र आणि त्यातले बारकावे त्यांनी समजून घेतले. महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा, हस्तकला, सांस्कृतिक वारसा आणि कारागिरांचे कौशल्य यातून त्यांना पाहायला मिळाले. पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आणि त्यांच्या टीमने मोदी यांचे स्वागत केले.

हा उपक्रम केवडिया (एकतानगर) येथे 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या काळात होत आहे. त्यात महाराष्ट्र पर्यटन विभाग सहभागी झाला आहे. या दालनातून राज्यातील वेगवेगळी पर्यटनस्थळे, सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकला देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसमोर मांडली जात आहे.

विभागाचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उपसंचालक विजय जाधव तिथे उपस्थित आहेत. दालनात राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहितीपत्रके आणि पर्यटनविषयक साहित्य ठेवले आहे. पैठणी विणकामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि हस्तकलेच्या विविध वस्तू ही या दालनाची मुख्य आकर्षणे आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम), दादर येथील किचन स्टुडिओच्या मदतीने महाराष्ट्राची खास खाद्यसंस्कृतीही सादर केली जात आहे. लोककला आणि सांस्कृतिक परंपरा दाखवण्यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवले आहेत.

गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरा यांची माहिती पर्यटकांना दिली जात आहे. पैठणीसारखी पारंपरिक वस्त्रकला, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्यावर विशेष भर आहे. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना देशपातळीवर प्रसिद्धी मिळेल. राज्यातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक कलाकार, कारागीर आणि खाद्यसंस्कृतीलाही प्रोत्साहन मिळेल, असे सांगण्यात आले.

पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव म्हणाले, "राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख करून देणे, परस्पर संवाद वाढवणे आणि विविधतेतील एकतेची भावना अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक ओळख, ऐतिहासिक वारसा, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपरंपरा आणि पर्यटन क्षेत्रातील विविध संधी देशभरातील पर्यटकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट देऊन राज्याची समृद्ध कला, संस्कृती आणि पारंपरिक पैठणी विणकाम समजून घेतले, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांची ही भेट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला आणि पर्यटनवैविध्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक प्रसिद्धी मिळवून देणारी ठरेल."

पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे म्हणाले, "महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी राज्यातील पर्यटनवैविध्याची देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी मांडणी करणे आवश्यक आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पर्यटन विभाग विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर राज्याचे पर्यटनवैभव प्रभावीपणे सादर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे आयोजित या उपक्रमातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा व्यापक स्तरावर पोहोचवण्याची संधी मिळत आहे.

महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट दिल्याबद्दल आणि राज्याच्या सांस्कृतिक वारशाची दखल घेतल्याबद्दल आम्ही प्रधानमंत्री यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनवैभवाला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक प्रसिद्धी मिळण्यासोबतच राज्यातील पर्यटनस्थळांकडे देशभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्यास आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल."

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ