ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच बिट्स पिलानीकडून गौरव खेत्रपाल यांचा सन्मान
तीन वेळा जेईई देऊनही आयआयटी हुकली, बिट्स पिलानीतही प्रवेश मिळाला नाही; आज त्याच संस्थेकडून खेत्रपाल यांना स्टार्टअप एक्सीलेंस अवॉर्ड मिळाला आहे.
इंजिनिअरिंगची आवड असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला देशातील नामांकित आयआयटी किंवा बिट्स पिलानीसारख्या संस्थेत शिकायचे असते. पण काही वेळा अपयश येते, हे स्वप्न अधुरे राहते आणि मन खचते. गौरव खेत्रपाल यांची गोष्ट अशीच सुरू झाली. सुरुवातीच्या अपयशावर मात करून त्यांनी स्वतःचे नशीब तर बदललेच, पण आज त्याच संस्थेकडून त्यांना मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
खेत्रपाल यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आपली प्रेरणादायी कहाणी सांगितली. त्यांनी १९९५ ते १९९७ या काळात तीन वेळा जेईई (JEE) ही परीक्षा दिली. तरीही आयआयटीमध्ये त्यांचा नंबर लागला नाही आणि प्रवेश मिळू शकला नाही.
त्यानंतर त्यांनी बिट्स पिलानीमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे गुण कटऑफपेक्षा ०.५ टक्क्यांहून कमी होते आणि त्यामुळे तिथेही त्यांचे स्वप्न हुकले. हा धक्का त्यांना इतका वाईट वाटला की, नंतर कुणी त्या संस्थेचा विषय काढला तरी ते कान बंद करून घेत असत.
आयआयटी आणि बिट्स पिलानी, दोन्हीकडची दारे बंद झाल्यावर खेत्रपाल यांनी एका टियर-३ कॉलेजमधून आपल्या पुढच्या शिक्षणाला सुरुवात केली. पण तेच आपले अंतिम लक्ष्य आहे, असे त्यांनी मानले नाही. आपल्या ध्येयाशी तडजोड न करता ते प्रयत्न करत राहिले. पुढे एका लेटरल एन्ट्रन्स परीक्षेत त्यांनी टॉप केले आणि त्यामुळे त्यांना टियर-२ कॉलेजमध्ये जाण्याची संधी मिळाली.
कालांतराने त्यांच्या आयुष्याला एक रंजक वळण मिळाले. ज्या बिट्स पिलानीत वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना प्रवेश मिळाला नव्हता, त्याच संस्थेत त्यांनी २००२-०३ मध्ये मास्टर डिग्रीसाठी प्रवेश घेतला. एकेकाळी ज्या संस्थेचे नाव ऐकले की त्यांना आपल्या अपयशाची आठवण व्हायची, तीच संस्था त्यांच्या उच्च शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग बनली.
या प्रवासाचा पुढचा टप्पा आणखी खास ठरला. काही वर्षांनी जयपूर येथे आयोजित केलेल्या एका माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात त्यांना 'स्टार्टअप एक्सीलेंस अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. Vanshiv Technologies मध्ये त्यांनी आणि त्यांच्या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना हा बहुमान मिळाला.
गौरव खेत्रपाल यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून एक गोष्ट दिसते. एखादी परीक्षा किंवा कॉलेजमधील अपयश माणसाचे संपूर्ण भविष्य ठरवू शकत नाही. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माणूस कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो.