वयाच्या ९०व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमध्ये १९वे विजेतेपद जिंकणारे तोशिसुके कानाझावा
जपानमधील ९० वर्षांच्या तोशिसुके कानाझावा यांनी ३१ ऑगस्टला मास्टर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. पत्नीच्या आजारपणात त्यांनी पुन्हा जिम सुरू केली आणि पूर्णपणे नैसर्गिक आहार व सरावाच्या जोरावर हा प्रवास सुरू ठेवला.
पन्नाशी ओलांडली की अनेकांना विविध आजार सतावायला लागतात, अंगात पूर्वीची ताकद राहत नाही. पण जपानमधल्या एका ९० वर्षांच्या आजोबांनी हे सगळं खोटं ठरवलंय. तोशिसुके कानाझावा असं त्यांचं नाव. ३१ ऑगस्टला झालेल्या मास्टर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेत ८५ वर्षांवरील गटात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदक जिंकलं. ही त्यांची साधीसुधी स्पर्धा नव्हती, तर त्यांच्या जिद्दीची आणि शिस्तीची जिवंत साक्ष होती. या विजयासोबत कानाझावा यांच्या नावावर १९वं राष्ट्रीय विजेतेपद जमा झालं.
ज्या वयात बहुतेक लोक घरात आराम करतात किंवा अंथरुणाला खिळलेले असतात, त्या वयात कानाझावा स्टेजवर जाऊन आपले स्नायू दाखवतात आणि जगातला सगळ्यात वयस्कर सक्रिय बॉडीबिल्डर म्हणून ओळखले जातात. गार्डियन आणि सीएनएनशी बोलताना त्यांनी आपल्या तंदुरुस्तीचं रहस्य आणि आयुष्याचा प्रवास सांगितला.
कानाझावा यांचा जन्म १९३६ साली जपानच्या शिमाने प्रांतात झाला. लहानपणापासूनच त्यांना खेळाची आवड होती. शाळेत असताना पोहणे आणि कुस्तीत पहिलं पदक मिळालं. वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी बॉडीबिल्डिंगमध्ये गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली आणि २४व्या व ३७व्या वर्षी 'मिस्टर जपान'चा किताबही मिळवला. पण सततच्या सरावाचा आणि शारीरिक ताणाचा त्रास झाल्याने वयाच्या ३४व्या वर्षी त्यांनी बॉडीबिल्डिंगमधून निवृत्ती घेतली.
पुढे कानाझावा ५० वर्षांचे असताना त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडायला लागली. तिला मानसिक आधार द्यावा, तिच्या चेहऱ्यावर हसू यावं आणि तिला पुढे जाण्याची उमेद मिळावी, म्हणून कानाझावा यांनी पुन्हा एकदा जिममध्ये जायचं आणि बॉडीबिल्डिंगमध्ये परतायचं ठरवलं. त्यांच्या पत्नीचं निधन झालं, पण आजही प्रत्येक स्पर्धेत उतरताना ते तिची आठवण ठेवतात आणि तिच्याच प्रेरणेने स्टेजवर जिंकतात.
आजच्या बॉडीबिल्डिंगच्या दुनियेत अनेक जण शॉर्टकट म्हणून स्टिरॉइड्स किंवा सप्लिमेंट्स वापरतात. पण कानाझावा ठामपणे सांगतात की त्यांचं शरीर १००% नैसर्गिक आहे. कुठलंही कृत्रिम औषध न घेता, केवळ योग्य आहार आणि शिस्तबद्ध व्यायामाच्या जोरावर त्यांनी आपले स्नायू टिकवून ठेवलेत. त्यांनी मासे आणि मटण खाणं पूर्णपणे सोडून दिलंय, म्हणजे ते शाकाहारी आहेत. शिवाय आयुष्यात त्यांनी कधीच दारू प्यायली नाही.
त्यांच्या रोजच्या आहारात सकाळी नाश्त्याला ब्राऊन राईस, नाटो (आंबवलेलं सोयाबीन) आणि पारंपरिक मिसो सूप असतं. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात ब्राऊन राईसवर जपानी मसाला फुरिकाके टाकून खातात. रोज २ अंडी खातात आणि दिवसातून ३ वेळा प्रोटीन शेक पितात, आधी ते ६ वेळा प्यायचे.
फक्त आहारच नाही, तर कानाझावा आजही रोज न चुकता जिममध्ये जातात आणि वेट ट्रेनिंग करतात. शरीराला पूर्ण विश्रांती मिळावी म्हणून रोज ७ तास गाढ झोप घेतात. "वय वाढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, ती थांबवता येत नाही; पण योग्य आहार आणि सरावाने म्हातारपणाचा वेग नक्कीच कमी करता येतो," असं कानाझावा सांगतात. वयाच्या ९०व्या वर्षीही ते थांबायला तयार नाहीत. ६० वर्षांवरील गटाच्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणं हे त्यांचं पुढचं लक्ष्य आहे. शिवाय हॉलिवूड स्टार आणि बॉडीबिल्डिंगमधले दिग्गज आर्नॉल्ड श्वार्झनेगर यांना प्रत्यक्ष भेटायची त्यांची इच्छा आहे.
कानाझावा यांचा हा प्रवास दाखवून देतो की, दृढ इच्छाशक्ती, संयम आणि योग्य जीवनशैली असेल, तर वय हे स्वप्नांच्या आड कधीच येत नाही.