CNG कारच्या विक्रीत अर्टिगा नंबर वन, 26 किमी मायलेज अन् 6 एअरबॅग्ज असलेली कार फक्त 8.90 लाखांत
ऑगस्ट 2026 मध्ये मारुती सुजुकी अर्टिगा सीएनजी देशातील सर्वाधिक विकली गेलेली सीएनजी कार ठरली असून टॉप 10 यादीत टाटा पंच आणि टाटा नेक्सॉननेही मोठी वाढ नोंदवली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे भारतीय ग्राहक आता सीएनजी गाड्यांकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत आणि याचा थेट फायदा मारुती सुजुकीच्या 'अर्टिगा' या एमपीव्हीला मिळाला आहे. ऑगस्ट 2026 च्या विक्री आकडेवारीनुसार अर्टिगा सीएनजीने पुन्हा एकदा देशातील नंबर-वन सीएनजी कार हा किताब पटकावला आहे. या महिन्यात तब्बल 13,352 ग्राहकांनी ही गाडी खरेदी केली.
मोठ्या कुटुंबांची गरज लक्षात घेऊन बनवलेली ही 7 सीटर कार गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे ऑगस्ट 2025 मध्ये 13,447 युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यंदा 1 टक्क्याने किंचित घटली असली तरी 13,352 युनिट्सची विक्री हा एक मोठा टप्पाच मानला जात आहे. परवडणारी किंमत, भरपूर जागा आणि दमदार मायलेज ही अर्टिगाच्या लोकप्रियतेमागची मुख्य कारणं आहेत.
अर्टिगा सीएनजीमध्ये 1.5 लिटरचं K15C स्मार्ट हायब्रिड पेट्रोल-सीएनजी इंजिन बसवण्यात आलं आहे. सीएनजी मोडवर हे इंजिन 87 bhp पॉवर आणि 121.5 Nm टॉर्क तयार करतं. सोबतीला 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असून त्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अगदी स्मूथ राहतो. या कारचा मायलेज प्रति किलो 26.11 किलोमीटर इतका आहे, जो या सेगमेंटमध्ये उठून दिसतो.
सुरक्षेच्या बाबतीतही अर्टिगामध्ये कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. यात 6 एअरबॅग्ज, ईबीएससह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि रिअर पार्किंग सेन्सर असे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत साधारण 8,90,000 रुपयांपासून सुरू होते.
अर्टिगाशिवाय ऑगस्ट 2026 च्या टॉप 10 सीएनजी कार्सच्या यादीत इतरही अनेक मॉडेल्सनी चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मारुती सुजुकी डिजायरने वार्षिक 26 टक्के वाढीसह एकूण 12,963 युनिट्सची विक्री केली. तिसऱ्या स्थानावरील मारुती सुजुकी वॅगनआरची विक्री 34 टक्क्यांनी वाढून 9405 युनिट्सवर पोहोचली.
चौथ्या क्रमांकावरील टाटा पंचने मात्र सर्वात मोठी झेप घेतली असून तब्बल 102 टक्के वार्षिक वाढीसह 7,767 युनिट्स विकल्या. पाचव्या स्थानावर असलेल्या मारुती सुजुकी ब्रेझाने 31 टक्के वाढीसह 7608 युनिट्सची विक्री नोंदवली, तर नुकत्याच लॉन्च झालेल्या मारुती सुजुकी विक्टोरिसने सहाव्या क्रमांकावर थेट 6833 युनिट्सची विक्री करत बाजारात आपली छाप उमटवली.
सातव्या क्रमांकावरील ह्युंदाई ऑराची विक्री 34 टक्क्यांनी वाढून 6485 युनिट्स झाली, तर आठव्या स्थानावरील टाटा नेक्सॉनची विक्री 40 टक्के वाढीसह 6178 युनिट्सवर पोहोचली. नवव्या क्रमांकावरील मारुती सुजुकी इकोने 20 टक्के वाढीसह 6107 युनिट्स आणि दहाव्या स्थानावरील मारुती सुजुकी फ्रॉन्क्सने 95 टक्क्यांच्या मोठ्या वाढीसह 6024 युनिट्सची विक्री केली.