६ ऑक्टोबरला एकाच दिवशी सहा नवीन गाड्या लॉन्च होणार, दोन कार आणि चार बाईकचा समावेश
ऑक्टोबर महिन्यात ऑटोमोबाईल उद्योगात अनेक नवीन गाड्या दाखल होत आहेत. ६ ऑक्टोबरला स्कोडा, होंडा आणि ट्रायम्फच्या गाड्या भारतीय बाजारात येणार आहेत.
ऑक्टोबर महिना ऑटोमोबाईल उद्योगासाठी अतिशय रोमांचक असणार आहे, कारण या महिन्यात अनेक नवीन गाड्या दाखल होत आहेत. विशेष म्हणजे, ६ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी सहा नवीन गाड्या भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च होणार आहेत. यात दोन कार आणि चार बाईकचा समावेश आहे. गाड्यांच्या टीझरमुळे बाजारात आधीच खळबळ उडाली असून वाहनप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता दिसत आहे. या बहुप्रतिक्षित लॉन्चमध्ये कोणती वाहने येत आहेत, ते पाहूया.
पहिली गाडी आहे स्कोडा स्लाविया फेसलिफ्ट (Skoda Slavia Facelift). स्कोडाची ही लोकप्रिय सेडान कार आता नव्या स्वरूपात येत आहे. कंपनीने या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल केले आहेत. गाडीच्या बाहेरच्या भागात रिवाइज्ड फ्रंट एंड, नवीन हेडलाईट्स, कनेक्टेड एलइडी लाईट बार, एलईडी डीआरएल्स, स्टायलिश अलॉय व्हील्स आणि आकर्षक टेललाईट्स देण्यात आले आहेत.
आतल्या बाजूला या स्लावियामध्ये १०.२४ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळेल, त्यात टर्न-बाय-टर्न नेविगेशनही असेल. त्याशिवाय १० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाईल. पॉवरट्रेनमध्ये मात्र कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणेच १.० लिटर आणि १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय कायम ठेवण्यात आला आहे.
दुसरी कार आहे होंडा एलिवेट फेसलिफ्ट (Honda Elevate Facelift). होंडाची ही लोकप्रिय एसयूवी देखील ६ ऑक्टोबरला नव्या अवतारात दाखल होत आहे. नवीन डिझाइन केलेले हेडलाईट्स, एलईडी डीआरएल्स, फ्रंट ग्रिल, बंपर, आकर्षक अलॉय व्हील्स आणि बदललेले टेललाईट्स यात आहेत.
केबिनमध्ये १०.२५ इंचाचे इन्फोटेनमेंट युनिट, ८ स्पीकरची ऑडिओ सिस्टीम, वायरलेस चार्जर, ७ इंचाचा सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान अशी आधुनिक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. इंजिनच्या बाबतीत जुनेच कार्यक्षम इंजिन कायम ठेवण्यात आले आहे.
बाईकच्या बाजूला ब्रिटिश मोटारसायकल उत्पादक कंपनी ट्रायम्फने (Triumph Motorcycles) नुकताच एक टीझर जारी केला आहे. त्याद्वारे चार नवीन बाईक ६ ऑक्टोबर रोजी लाँच होणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. यात बहुप्रतिक्षित बोनविले ४०० (Bonneville 400) लॉन्च केली जाण्याची दाट शक्यता आहे. या बाईकची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा सुरू होती.
रेट्रो-मॉर्न लूक असलेली ही बाईक थेट रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०, बुलेट ३५० आणि होंडा सीबी ३५० शी स्पर्धा करेल. याशिवाय कंपनी 'स्ट्रीट ट्रिपल' आणि दोन नवीन 'टायगर' मॉडेल्सही बाजारात आणणार आहे.
एकाच दिवशी होणाऱ्या या सहा लॉन्चमुळे यंदाचा सणासुदीचा काळ ग्राहकांसाठी खूपच रंजक ठरणार आहे.