BYD ची नवी इलेक्ट्रिक SUV लाँच; 30 मिनिटांत चार्जिंग, 501 किमी रेंज, किंमत 10 लाखांच्या आत
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी BYD ने चायनीज बाजारात नवी 2027 Yuan UP (Atto 2) फिची एडिशन लाँच केली आहे. परवडणारी किंमत आणि दमदार फीचर्समुळे ही कार सध्या चर्चेत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या जागतिक बाजारात आपला दबदबा असलेल्या BYD या कंपनीने आणखी एक नवी एसयूव्ही बाजारात आणली आहे. चायनीज मार्केटमध्ये कंपनीने 2027 BYD Yuan UP, म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात Atto 2 या नावाने ओळखली जाणारी कार, अधिकृतपणे लाँच केली आहे. या गाडीची फिची एडिशन ही रिफ्रेश्ड आवृत्ती असून, आकर्षक लूक, दमदार फीचर्स आणि परवडणारी किंमत यामुळे ती सध्या इलेक्ट्रिक क्रॉसओवर सेगमेंटमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
या नव्या इलेक्ट्रिक एसयूवीचे एकूण पाच व्हेरियंट्स बाजारात उपलब्ध आहेत आणि त्यांची भारतीय चलनानुसार अंदाजे किंमत पुढीलप्रमाणे आहे. बेस मॉडेल असलेल्या 301 KM Leading या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत जवळपास 74,800 युआन म्हणजे सुमारे 9.35 लाख रुपये इतकी आहे, तर ट्रेड-इन ऑफर्ससह ही किंमत 8.72 लाख रुपयांपर्यंत खाली येते. 401 KM Leading या व्हेरियंटची किंमत सुमारे 10.22 लाख रुपये, तर 401 KM Vitality या व्हेरियंटची किंमत सुमारे 11.23 लाख रुपये आहे. लाँग रेंज असलेल्या 501 KM Beyond या व्हेरियंटसाठी सुमारे 11.85 लाख रुपये मोजावे लागतील. सर्वात प्रीमियम असलेल्या 501 KM Excellence या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 13.09 लाख रुपये असून, ट्रेड-इन ऑफरसह ती सुमारे 12.45 लाख रुपयांपर्यंत कमी होते. ही आक्रमक किंमत रचना स्पर्धात्मक बाजारात इतर ब्रँड्ससाठी मोठे आव्हान ठरू शकते.
डिझाइनबाबत बोलायचे झाल्यास, या कारची लांबी 4310 मिमी, रुंदी 1830 मिमी आणि उंची 1675 मिमी इतकी आहे, तर व्हीलबेस 2620 मिमी आहे. एनर्जेटिक येलो आणि ऑक्सीजन ब्लू असे नवे रंग पर्यायही यात समाविष्ट करण्यात आले आहेत. केबिनमध्ये 12.8 इंच रोटेटेबल टचस्क्रीनसह DiLink 100 कॉकपिट सिस्टम, 50 वॅटचा एअर-कूल्ड वायरलेस फोन चार्जर, 60:40 स्प्लिट रियर बेंच सीट यामुळे बूट स्पेस 1320 लिटरपर्यंत वाढवता येते. याशिवाय पॅनोरामिक ग्लास इलेक्ट्रिक सनरूफ आणि फ्रंट सीट व्हेंटिलेशन तसेच हीटिंगचे फीचर्सही देण्यात आले आहेत.
परफॉर्मन्सच्या बाबतीत या कारमध्ये सिंगल फ्रंट-माउंटेड मोटर वापरण्यात आली असून, ती 94 एचपी पॉवर आणि 180 एनएम टॉर्क जनरेट करते. यात फिनड्रेड्स कंपनीची लिथियम आयर्न फॉस्फेट ब्लेड बॅटरी बसवण्यात आली आहे. 51.13 kWh बॅटरी पॅकमुळे ही कार तब्बल 501 किलोमीटरची CLTC रेंज देते, तर 32 kWh आणि 45.12 kWh बॅटरी पर्यायांमध्ये अनुक्रमे 301 किमी आणि 401 किमी रेंज मिळते. डीसी फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी अवघ्या 30 मिनिटांत 30 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
विक्रीच्या आकडेवारीनुसार, Yuan UP या मॉडेलने ऑगस्ट 2026 मध्ये स्थानिक बाजारात तब्बल 22,958 युनिट्सची विक्री नोंदवत उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. जीली EX2 सारख्या छोट्या इलेक्ट्रिक कारना ही गाडी थेट टक्कर देत असून, परवडणारी किंमत आणि लांब रेंज यामुळे ग्राहकांची पसंती मिळवत आहे.