२६ सप्टेंबर अणुशस्त्र निर्मूलन दिन: संयुक्त राष्ट्रांचा पुढाकार, जगाला अण्वस्त्रमुक्तीचे आवाहन
दरवर्षी २६ सप्टेंबरला जगभर जागतिक अणुशस्त्र निर्मूलन दिन पाळला जातो. संयुक्त राष्ट्रांनी २०१३ मध्ये हा दिवस जाहीर केला होता, आणि अण्वस्त्रांच्या धोक्याची आठवण करून देत जगाला त्यांच्या निर्मूलनासाठी एकत्र आणणे हा त्यामागचा उद्देश आहे.
जगभरात आज तंत्रज्ञान आणि विज्ञान वेगाने पुढे जात असलं, तरी वाढता भू-राजकीय तणाव आणि युद्धाची भीती यामुळे अणुशस्त्रांचा धोका पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. जागतिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता टिकवायची असेल तर जगातल्या सगळ्या देशांनी अण्वस्त्रांचा त्याग करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर अणुशस्त्र निर्मूलन दिन पाळला जातो.
हा दिवस दरवर्षी एक गोष्ट आवर्जून सांगतो, जोपर्यंत जगात कुठेही अणुशस्त्रं शिल्लक आहेत, तोपर्यंत माणसाचं आणि पृथ्वीचं भवितव्य सुरक्षित नाही. फक्त अण्वस्त्रांचा साठा करणं किंवा युद्धात ती वापरण्याची धमकी देणं, हा काही नुसता लष्करी खेळ नाही, तर लाखो निष्पाप माणसांच्या जिवाशी खेळला जाणारा अत्यंत धोकादायक जुगार आहे.
माणसाने आजवर तयार केलेल्या शस्त्रांमध्ये अणुशस्त्रं सगळ्यात विनाशकारी आणि जीवघेणी मानली जातात. दुसऱ्या महायुद्धात जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बने एका क्षणात लाखो लोकांचा जीव घेतला होता, हा इतिहास साक्षीला आहे. त्या हल्ल्याचे शारीरिक, मानसिक आणि जनुकीय परिणाम तिथल्या पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागले.
आताच्या काळात बनवली जाणारी अणुशस्त्रं त्या वेळच्या बॉम्बपेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आणि घातक आहेत. समजा आज कुठल्या युद्धात अशी शस्त्रं वापरली गेली, तर काही सेकंदांत पूर्ण शहरं्च्या शहरं नष्ट होतील, कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडतील. रेडिएशनमुळे हवा, पाणी, जमीन आणि संपूर्ण अन्नसाखळी दूषित होईल. यातून तयार होणाऱ्या 'न्युक्लियर विंटर'सारख्या भयंकर हवामान बदलामुळे पृथ्वीवरची शेती आणि सजीवसृष्टी उद्ध्वस्त होऊ शकते.
संयुक्त राष्ट्र महासभेने २०१३ साली एका खास ठरावाद्वारे २६ सप्टेंबर हा दिवस जागतिक अणुशस्त्र निर्मूलन दिन म्हणून जाहीर केला. सगळ्या सदस्य राष्ट्रांना एकत्र आणून अण्वस्त्रमुक्त जग घडवण्यासाठी ठोस धोरणं आखणं, हा यामागचा मुख्य हेतू होता. या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आणि जगभरातल्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उच्चस्तरीय परिषदा, चर्चासत्रं आणि धोरणात्मक बैठका घेतल्या जातात.
या उपक्रमांमधून महासत्ता आणि अणुशस्त्रधारी देशांवर Non-Proliferation Treaty (NPT) आणि Treaty on the Prohibition of Nuclear Weapons (TPNW) यांसारख्या आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करण्यासाठी दबाव आणला जातो. जगातला अणुशस्त्रसाठा कमी करणं, नव्या अणुचाचण्यांवर बंदी आणणं आणि टप्प्याटप्प्याने सगळी अणुशस्त्रं पूर्णपणे नष्ट करणं, यावर जागतिक नेत्यांचा भर असतो.
अणुशस्त्र निर्मूलनाचं काम फक्त राजकारणी किंवा लष्करी अधिकाऱ्यांपुरतं मर्यादित नाही, त्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी विविध स्वयंसेवी संस्था, शाळा-कॉलेज आणि शांततावादी संघटनांकडून रॅली, व्याख्यानं, कार्यशाळा आणि निबंध स्पर्धा घेतल्या जातात. यातून तरुण पिढीला अणुशस्त्रांच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दुष्परिणामांची माहिती दिली जाते.
अणुशस्त्रं बनवण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च होतात. हाच पैसा जर जगातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि हवामान बदलासारख्या गंभीर प्रश्नांवर वापरला गेला, तर संपूर्ण जग समृद्ध होऊ शकतं. म्हणूनच २६ सप्टेंबर हा दिवस हे सांगतो की, शांतता, अहिंसा आणि परस्पर सहकार्यानेच पुढच्या पिढीच्या हाती एक सुरक्षित आणि अण्वस्त्रमुक्त पृथ्वी सोपवता येईल.