अमेरिकेचे सैन्य २३ वर्षांनंतर इराकमधून पूर्णपणे माघारी परतणार
इराकमधील अमेरिकेच्या सैन्याची २३ वर्षांनंतर पूर्ण माघार होणार आहे. इराकमध्ये एकीकडे आनंद आहे, तर कुर्द लोकांची चिंता वाढली आहे.
जागतिक राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडत आहे. अमेरिकेचे सैन्य तब्बल २३ वर्षांनंतर इराकमधून माघारी आपल्या देशात परतणार आहे. याआधी अमेरिकेने अफगाणिस्तानमधूनही अशीच माघार घेतली होती आणि त्यावेळची सगळी दृश्ये जगाने पाहिली होती. इराकमधील जनतेचा वाढता रेटा आणि मध्य पूर्वेतील संघर्ष ही यामागची मुख्य कारणे असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
या पार्श्वभूमीवर इराकमध्ये एका बाजूला आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला कुर्द लोकांचे टेन्शन वाढले आहे. अमेरिकेच्या इराकमध्ये येण्याने जशी काही लोकं सुखावली, तशीच आता अमेरिका माघारी फिरल्याने काही लोकं दुखावली जाणार असल्याचे मिळालेल्या माहितीवरून कळत आहे.
या सगळ्याचा इतिहास असा की, २००३ साली सद्दाम हुसेन यांच्यावर जैविक शस्त्रे असल्याचा आरोप लावून अमेरिका इराकमध्ये घुसली. इराण आणि अफगाणिस्तानमध्ये डोंगर असल्यामुळे अमेरिकेला ते प्रदेश जिंकता आले नाहीत. इराकमध्ये मात्र परिस्थिती उलट आहे. तिथे मोठे डोंगर नाहीत, सपाट प्रदेश जास्त आहे, त्यामुळे सद्दामला हरवणे अमेरिकेला शक्य झाले. इराकमधील काही राजकीय लोकांना हाताशी धरून अमेरिकेने सत्तांतर घडवून आणले.
सद्दामला फाशी देण्यात आली. पण कालांतराने इराकमध्ये इस्लामी विचारधारेची लोकं एकत्र आली आणि ISIS च्या नावाने अमेरिकेशी संघर्ष करू लागली. त्याचबरोबर अमेरिकेने इराक सरकारच्या सैन्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्यांना शस्त्रे पुरवली. काही राजकीय विश्लेषकांच्या मते सद्दाम हुसेन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत होते आणि त्यांचे नियम मानत नव्हते. इराकमधील तेलाच्या साठ्यांवर आपले नियंत्रण राहील की नाही, यासाठी त्यांचा पाडाव केला गेला, असे मत आहे.
आता कुर्दिस्तानचे काय होणार, हा प्रश्न आहे. कुर्द लोकं हा मध्यपूर्वेतील मोठी लोकसंख्या असलेला जातीय समुदाय आहे. ते प्रामुख्याने इराक, तुर्की, इराण आणि सीरिया या चार देशांमध्ये राहतात. त्यांची स्वतंत्र भाषा, संस्कृती आणि राष्ट्रीय ओळख आहे, मात्र त्यांचे स्वतःचे सार्वभौम राष्ट्र नाही. इराकमधील अमेरिकेच्या उपस्थितीमुळे त्यांना मोठा सहारा मिळत होता.
अमेरिका तिथे कुर्द लोकांचा पाठीराखा होता. त्यामुळे अमेरिका गेल्यावर इराकी इस्लामिक गट आणि कुर्द यांच्या संघर्षात कुर्द लोकं कमकुवत होतील, अशी शक्यता आहे. म्हणूनच इराकमध्ये एका बाजूला आनंद, तर दुसऱ्या बाजूला सन्नाटा पसरला आहे.
अमेरिका सैन्य का काढत आहे, याची कारणेही समोर येत आहेत. इराकमधील सैन्याला पुरेसे प्रशिक्षण आणि कौशल्य शिकवल्यानंतर आता अमेरिकेला तिथे राहण्याची जास्त गरज वाटत नाही. मध्य पूर्वेतील, विशेषतः इराणसोबतचा वाढता संघर्ष हेही महत्त्वाचे कारण असल्याचे समजते. माघारीचा निर्णय ज्यो बायडन राष्ट्राध्यक्ष असतानाच निश्चित झाला होता. नंतर ट्रम्प सत्तेत आल्यावर त्यांनी तो प्रस्ताव कायम ठेवून अमलात आणला आहे.