१६ ते १९ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच राज्याच्या अनेक भागांत मान्सूनोत्तर पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला, तरी अनेक भागांत मान्सूनोत्तर पावसाने ठाण मांडायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळणार असला, तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सध्या राज्यातील काही भागांत ऑक्टोबर हीटचा, म्हणजे उष्ण आणि दमट हवामानाचा, प्रभाव जाणवत आहे. मात्र आता हवामानात मोठा बदल होत आहे. विशेषतः दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोवा पट्ट्यात हवामानाचा नूर बदलला आहे. १६ ते १९ ऑक्टोबर या काळात राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
कोकणात १६ ऑक्टोबरला ठाणे आणि मुंबईत तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहील, तर रायगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान कोकणात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजा चमकू शकतात.
मध्य महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरला कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. १७ ऑक्टोबरला या यादीत पुणे आणि पुण्याचा घाट परिसरही येणार असून मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढताना दिसेल. १८ आणि १९ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात १६ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १७ ऑक्टोबरला नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाच्या वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १८ आणि १९ ऑक्टोबरला मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा विस्तार वाढू शकतो.
विदर्भातील काही जिल्ह्यांत या काळात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विभागवार अंदाजानुसार १६ आणि १७ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. १८ आणि १९ ऑक्टोबरला कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दोन्ही दिवशी तिन्ही विभागांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो. विदर्भात १८ आणि १९ ऑक्टोबरलाही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.