शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:30 IST

१ नोव्हेंबरपासून 4G, 5G कॉलवर दिसणार कॉल करणाऱ्याचे नाव; DoT चा CNAP आदेश

दूरसंचार विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना १ नोव्हेंबरपासून 4G आणि 5G नेटवर्कवर CNAP सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

१ नोव्हेंबरपासून 4G, 5G कॉलवर दिसणार कॉल करणाऱ्याचे नाव; DoT चा CNAP आदेश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अनोळखी नंबरवरून कॉल आला की तो उचलावा की नाही, असा प्रश्न रोजच अनेकांना पडतो. बँकेच्या नावाने किंवा कुरियरच्या नावाने फसवणुकीचे कॉल येण्याचे प्रकारही अनेकदा घडतात. आता यावर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक कॉलवर समोरच्या व्यक्तीचे नाव दिसणार आहे. त्यासाठी CNAP म्हणजे Calling Name Presentation ही सिस्टम सक्तीची करण्यात आली आहे.

दूरसंचार विभागाने, म्हणजे DoT ने, Jio, Airtel, Vi आणि BSNL या सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्पष्ट आदेश दिला आहे. १ नोव्हेंबरपासून देशातील सर्व 4G आणि 5G नेटवर्कवर CNAP सुरू करावेच लागेल. यात कोणतीही सूट नाही. सध्या कंपन्या वेगवेगळ्या सर्कलमध्ये याची टेस्टिंग करत आहेत आणि काही जणांना कॉलवर नाव दिसायलाही लागले आहे.

DoT ने सांगितले आहे की हा नियम सध्या फक्त 4G आणि 5G साठी आहे. 2G, 3G आणि लँडलाईन नंबरसाठी वेगळा आदेश नंतर येईल, कारण त्यांचे तंत्रज्ञान वेगळे आहे.

हे Truecaller सारखेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडेल. पण तसे नाही. Truecaller हे एक App आहे आणि लोकांनी सेव्ह केलेल्या नावावरून ते नाव दाखवते. त्यामुळे अनेकदा चुकीचे नावही दिसते. कोणी तुमचे नाव काहीही सेव्ह केले तरी तेच दिसते.

CNAP मात्र सरकारी सिस्टम आहे. सिम घेताना तुम्ही दिलेले, KYC कागदपत्रांवर असलेले नाव, म्हणजे आधार कार्डवर आहे तेच नाव, समोरच्याला दिसेल. याला CAF म्हणजे Customer Application Form मधले नाव म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही राहुल पाटील या नावाने सिम घेतले असेल, तर तुम्ही कोणाला कॉल केलात की त्याच्या फोनवर Rahul Patil असेच नाव येईल. तुम्ही हे नाव बदलू शकत नाही आणि लपवूही शकत नाही. त्यामुळे फसवणूक करणे खूप कठीण होईल.

याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे स्पॅम आणि फ्रॉड कॉल बंद होतील. आजकाल कॉल येतो आणि समोरचा म्हणतो की मी बँकेतून बोलतोय, तुमचे KYC अपडेट करायचे आहे. पण तो कोण आहे हेच कळत नाही. CNAP आल्यावर त्याचे खरे नाव दिसेल. नाव वेगळे असेल आणि तो बँकेचे नाव सांगत असेल, तर हा फ्रॉड आहे हे लगेच लक्षात येईल.

अनोळखी नंबर आला तरी तो कोणाचा आहे हे आधीच कळेल. महत्त्वाचा कॉल असेल तर उचलता येईल, नसेल तर टाळता येईल. त्यामुळे महत्त्वाचे कॉल मिस होणार नाहीत. महिलांसाठीही हे सुरक्षित ठरणार आहे. अनेकदा अनोळखी नंबरवरून त्रासदायक कॉल केले जातात. आता नाव दिसल्यामुळे अशा लोकांवर लगेच कारवाई करणे सोपे होईल.

सरकारने निर्णय घेतला असला तरी काही प्रश्न अजून बाकी आहेत. एखाद्याने दुसऱ्याच्या नावाने सिम घेतले असेल तर काय, किंवा कंपनीच्या नावाने घेतलेल्या सिमवर कोणाचे नाव दिसणार, याबाबत अजून स्पष्टता यायची आहे. काही लोकांना आपले नाव सगळ्यांना दाखवायचे नसेल, तर त्यांच्या प्रायव्हसीचे काय, यावरही चर्चा चालू आहे. मात्र सुरक्षेसाठी हे पाऊल गरजेचे आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

एकंदरीत १ नोव्हेंबरपासून Truecaller सारख्या App ची गरजच संपून जाईल आणि फोनमध्येच सरकारी पद्धतीने खरे नाव दिसेल. सामान्य मोबाईल वापरणाऱ्यांसाठी ही गोष्ट खूप दिलासा देणारी ठरू शकते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ