शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पुण्यात पोलीस आयुक्तांकडून आणखी चौघे निलंबित, दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई

पुण्यात पोलीस आयुक्तांकडून आणखी चौघे निलंबित, दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

कामातील हलगर्जीपणा आणि पैशांच्या मागणीच्या प्रकरणांत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका अधिकाऱ्यासह चौघांना निलंबित केले आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली आहे. एका अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केले. कामातील हलगर्जीपणा आणि पैसे उकळण्यासाठी केलेला खटाटोप अशा वेगवेगळ्या प्रकरणांत ही कारवाई झाली आहे. दोन दिवसांत एकूण आठ जणांचे निलंबन झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पहिली कारवाई बंडगार्डन पोलीस ठाण्यातील दोघांवर झाली. पोलीस उपनिरीक्षक अमोल धुमाळ आणि पोलीस हवालदार तुषार आल्हाट यांना निलंबित करण्यात आले आहे. बंडगार्डन पोलिसांत एका हॉटेलविरोधात आप्रवास आणि परदेशी नागरिक अधिनियम, २०२५ अन्वये गुन्हा नोंद आहे. परकीय नागरिकांच्या वास्तव्याची माहिती देण्याच्या संदर्भातील या गुन्ह्यात स्टाफपासून जीएम (जनरल मॅनेजर) पर्यंत एकूण पाच आरोपी आहेत. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक धुमाळ यांच्याकडे होता, तर हवालदार आल्हाट हे त्यांचे मदतनीस म्हणून काम पाहत होते.

तपासादरम्यान हॉटेलचे मॅनेजर तेजस धुळबुळू चौकीत भेटायला आले होते. त्यावेळी आरोपींची संख्या कमी करण्यासाठी आणि फक्त एकालाच अटक करण्यासाठी उपनिरीक्षक धुमाळ यांनी काहीही न बोलता हाताची दोन बोटे दाखवली, असे समोर आले आहे. त्यानंतर आल्हाट तुमच्याशी बोलतील, असेही त्यांनी सांगितले. पुढे आल्हाट यांनी दोन बोटे म्हणजे दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितल्याचे समोर आले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले.

दुसरी कारवाई पोलीस शिपाई बाबुराव पोपट ढोले यांच्यावर झाली आहे. त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात असताना ते मुंबई-बेंगलोर महामार्गावर गणवेशात थांबले आणि एका कंटेनर चालकाकडे ५ हजार रुपयांची मागणी केली, असा आरोप आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून ढोले यांना अटकही करण्यात आली आहे. मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

तिसरी कारवाई लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राहुल चौधरी यांच्यावर झाली. मांजरी भागातील एका अल्पवयीनाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चिलूमूला रजनिकांत यांनी हे निलंबनाचे आदेश दिले आहेत.

अशा प्रकारे दोन दिवसांत वेगवेगळ्या कारणांमुळे आठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. यामुळे पोलीस दलात चर्चा सुरू आहे.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ