गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पुण्यात पोलीस आयुक्तांकडून मार्केटयार्डच्या वरिष्ठ निरीक्षकासह तिघांचे निलंबन

पुण्यात पोलीस आयुक्तांकडून मार्केटयार्डच्या वरिष्ठ निरीक्षकासह तिघांचे निलंबन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर दोन अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यासह तिघांना निलंबित केले आहे. कामात हलगर्जीपणा किंवा कुचराई केली, तर थेट निलंबनाची कारवाई होऊ शकते, असा गर्भित इशाराच यातून पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.

यातली एक कारवाई हवालाप्रकरणात पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरून संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांवर झाली आहे. बाकीच्या दोन प्रकरणांत एक महिला अधिकारी आणि एक महिला कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना ३० लाखांचे हवालाप्रकरण भोवले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदारांनी सांगितलेल्या घटनेनुसार, पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे ७ ऑक्टोबरला दुपारी श्रवण देवासी आणि गणपत देवासी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पाच जणांनी त्यांच्या तोंडावर स्प्रे मारला आणि ३० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला. त्यानंतर मार्केटयार्ड पोलिसांना माहिती देण्यात आली आणि उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे कर्मचाऱ्यांसह तिथे आले.

घटनेची माहिती घेऊन ते पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. तिथे पोलिसांनी त्यांची तक्रार एका कागदावर लिहून घेतली आणि कॅमेरे पाहून तुमचा गुन्हा दाखल करू, असे सांगितले. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी त्यांना अनेकदा पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. तरीही अधिकाऱ्यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला नाही. फक्त प्रॉपर्टी मिसिंगची तक्रार नोंदवून घेतली.

हा प्रकार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर गेल्यावर त्यांना यात बेशिस्त वर्तन आणि बेजबाबदारपणा दिसून आला. शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्यामुळे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत जगताप यांचे निलंबन करण्यात आले आहे.

दुसरी कारवाई फुरसुंगी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कचरू जाधव यांच्यावर झाली आहे. एका गंभीर गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे होता. त्यात त्यांनी गंभीर त्रुटी ठेवल्या आणि अक्षम्य चुका केल्या, म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

त्याच प्रकरणात आरोपीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तेव्हा तपासी अधिकारी म्हणून जाधव यांनी न्यायालयात त्रोटक आणि मोघम स्वरूपाचा अहवाल सादर केला. सुनावणीला स्वतः न्यायालयात हजर राहणे अपेक्षित होते, पण त्या हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली, असे आदेशात म्हटले आहे.

तिसरी कारवाई महिला कर्मचारी अश्विनी केकान यांच्यावर झाली आहे. मद्यपान करून चारचाकी कार उलट दिशेने चालवणे, ती फुटपाथवर धडकवणे आणि नागरिकांना तसेच इतर वाहनचालकांना शिवीगाळ करणे, या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबनाची कारवाई केली. केकान काळेपडळ पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहेत. ही घटना घडली तेव्हा त्या दोन दिवसांच्या रजेवर होत्या.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ