आपली मुलं पुढारी किंवा उद्योजक व्हावीत, प्रशासनात येऊ नयेत: तुकाराम मुंढे
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत आपल्या मुलांनी प्रशासकीय सेवेत न जाता राजकारण किंवा उद्योगात उतरावं, असं मत मांडलं आणि त्यामागचं कारणही सांगितलं.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची सध्या जोरदार चर्चा आहे. ते ज्या खात्यात जातात, तिथल्या लोकांना त्यांचा धाक वाटतो. आता अन्न आणि औषध प्रशासन विभागात आल्यावर रस्त्यावरच्या ठेल्यांपासून ते मोठ्या रेस्टॉरंटपर्यंतच्या मालकांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं आहे. नागरिकांच्या आरोग्याशी हयगय करणाऱ्यांना त्यांनी आपल्या पदाचा खाक्या दाखवला आहे. त्यामुळे अधिकारी असावा तर मुंढेंसारखाच, असं लोक बोलत आहेत. अनेक तरुण मुलंही त्यांच्यासारखं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतात.
मात्र खुद्द मुंढे यांना आपली मुलं राजकारणी व्हावीत असं वाटतं. एका मुलाखतीत ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. तुमच्याप्रमाणे तुमची मुलंही प्रशासकीय सेवेत जावीत असं वाटतं का, असा प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी थेट नाही, असं उत्तर दिलं.
भविष्यात माझी मुलं पुढारी किंवा उद्योजक व्हावीत असं मला वाटतं, असं मुंढे म्हणाले. त्यांनी राजकारण किंवा व्यापारात रमावं, असाच सल्ला मी त्यांना देईन, असंही ते म्हणाले. आजच्या जेनजीने असे मार्ग निवडले पाहिजेत, जिथे प्रशासकीय बंधनं नसतील. म्हणजे समाजासाठी कोणत्याही दबावाशिवाय आणि मनमोकळेपणाने काम करता येईल, असं त्यांनी सांगितलं.
माझ्या मुलांनी मला विचारलं की प्रशासकीय अधिकारी व्हावं का, तर मी त्यांना थेट सांगेन की अजिबात बनू नका, असं मुंढे म्हणाले. मुलांनी उद्योजक किंवा पब्लिक लीडर व्हावं, कारण सिस्टिमच्या कोणत्याही दबावाशिवाय त्यांना समाजाच्या विकासात हातभार लावता येईल, असं त्यांना वाटतं. जनसेवेसाठी राजकारण आणि उद्योग ही दोन क्षेत्रं अतिशय चांगली आहेत, असं त्यांचं मत आहे. आजच्या युवा पिढीकडे अमर्याद ऊर्जा आणि ज्ञान आहे. त्यामुळे ज्या करिअरमध्ये त्यांचं स्वातंत्र्य चौकटीत अडकून पडेल, तिथे या मुलांनी अडकू नये, असं मुंढे म्हणाले.
मुंढे यांच्या 21 वर्षांच्या सेवेत त्यांच्या 25 बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाचा फटका त्यांच्या कुटुंबालाही बसला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांचा मुलगा 5वीत जाईपर्यंत त्याला सहा वेळा शाळा बदलावी लागली. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांच्या पत्नीलाही खूप त्रास झाला.
जनसेवेचा हा कठीण मार्ग मीच निवडला होता आणि या कठीण प्रसंगांना तोंड द्यायला मी तयार होतो, असं ते म्हणाले. पण या काळात त्यांच्या कुटुंबाला मोठा त्याग करावा लागला. म्हणूनच आपल्या मुलांनी या मार्गाने जाऊ नये, असं त्यांना वाटतं.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.