पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला; १० हजारांहून अधिक धावपटूंची नोंदणी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतातील सर्वात जुन्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक असलेली ऐतिहासिक ४० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार, ६ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन चॅरिटेबल ट्रस्टने ही घोषणा केली. या मॅरेथॉनचे संस्थापक स्वर्गीय सुरेश कलमाडी यांचे जानेवारी २०२६ मध्ये निधन झाले. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून यंदाची स्पर्धा 'स्वर्गीय सुरेश कलमाडी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६' या नावाने घेतली जाईल.
या ऐतिहासिक पर्वासाठी देशभरातून आतापर्यंत १० हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे. केनिया, इथिओपिया, टांझानिया यांसारख्या देशांतील १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२६ आहे आणि www.marathonpune.com या संकेतस्थळावर नोंदणी सुरू आहे.
यंदाच्या पर्वासाठी 'पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा' हा सामाजिक संदेश ठरवण्यात आला आहे. स्पर्धेचे संचालक म्हणून सुमंत वायकर, तांत्रिक संचालक म्हणून वसंत गोखले आणि संयुक्त संचालक म्हणून गुरबाज कौर व रोहन मोरे जबाबदारी सांभाळत आहेत.
वैद्यकीय समितीचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डॉ. राजेंद्र जगताप यांचा वारसा पुढे नेण्यासाठी डॉ. युवराज जगताप, डॉ. शिवशरण आणि डॉ. प्रियांक जवळे हे वैद्यकीय सेवांचे समन्वय करणार आहेत.
सर्व गटांच्या स्पर्धांची सुरुवात सारसबागेजवळील बाबूराव सणस क्रीडांगणावरून होईल. पूर्ण मॅरेथॉन (४२.१९५ किमी) पहाटे ३.०० वाजता सुरू होईल. अर्धमॅरेथॉन (२१.०९७५ किमी) पहाटे ३.३० वाजता, १० किमीची शर्यत सकाळी ६.३० वाजता, ५ किमीची सकाळी ७.३० वाजता आणि ३.५ किमीची सकाळी ७.४५ वाजता सुरू होईल.
धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी मार्गात काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. सुधारित मार्ग नोव्हेंबरच्या मध्यावर जाहीर केला जाईल. तसेच पूर्ण आणि अर्धमॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या धावपटूंना विशेष फिनिशर पदके दिली जातील.
बिसलेरी (हायड्रेशन), पोकारि स्वेट (इलेक्ट्रोलाइट) आणि सुहाना ग्रुप (नाश्ता) यांचे सहकार्य स्पर्धेला लाभणार आहे. विविध कॉलेजांचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतील. पुण्याच्या क्रीडा परंपरेचा हा ४० वा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी केले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.