मराठीतील पहिला एआय चित्रपट 'बागुलबुवा', अभिजीत खांडकेकरसह ५५ कलाकार झळकणार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चेतन चावडा दिग्दर्शित 'बागुलबुवा' हा खरे कलाकार घेऊन संपूर्णपणे एआयद्वारे बनवलेला पहिला मराठी चित्रपट असून त्याचा टायटल टीझर सोशल मीडियावर लाँच झाला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) प्रभाव आता सगळ्याच क्षेत्रांत वाढत चालला आहे. एआयच्या मदतीने आतापर्यंत काही चित्रपट तयार झाले आहेत, पण मराठी चित्रपटसृष्टीत असा प्रयोग आधी झाला नव्हता. ती उणीव आता भरून निघाली आहे. 'बागुलबुवा' हा मराठी चित्रपट पहिल्यांदाच एआयच्या माध्यमातून तयार झाला आहे.
या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात खरे कलाकार घेतले आहेत आणि तरीही चित्रपट एआयद्वारे बनवला आहे. असा नवा प्रयोग करून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. चेतन चावडा दिग्दर्शित हा चित्रपट मराठीतील पहिला AI चित्रपट म्हणून ओळखला जाणार आहे.
एस एस फिल्म्स प्रॉडक्शनने चित्रपटाची निर्मिती केली असून शरद पाटील आणि अंजली पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेते आणि दिग्दर्शक चेतन चावडा यांनी कथालेखन आणि दिग्दर्शन केले आहे. पटकथा नितिन चव्हाण यांनी लिहिली, संकलन विनोद राजे यांनी केले, व्हीएफएक्स अथर्व चव्हाण यांनी केले आहे आणि स्टोरीबोर्ड आकाश पांडे यांनी केला आहे. मेटाफेक्स प्रोडक्शनने चित्रपटाच्या एआयचे काम पाहिले आहे. आदिती द्रविड यांनी लिहिलेल्या गीतांना साई पियूष यांचे संगीत लाभले आहे.
अभिनेता अभिजीत खांडकेकर या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी ५५ दमदार कलाकार असतील, पण त्यांची नावे अजून गुलदस्त्यातच ठेवली आहेत. त्यामुळे ते कलाकार कोण आहेत, हे प्रेक्षकांना नंतरच कळणार आहे.
चित्रपटाचा टायटल टीझर सोशल मीडियावर लाँच झाला आहे. तो एखाद्या हॉलिवूडपटासारखा वाटतो. कथानक पुणे आणि आसपासच्या परिसरात घडते, असे त्यातून दिसते. अचानक एक संकट येते आणि त्याच्याकडे पाहिल्यावर डोळे बिघडतात, अशी स्थिती होते. संकट म्हणून आलेला हा 'बागुलबुवा' नेमका काय आहे, याचे उत्तर चित्रपटातूनच मिळणार आहे.
इतक्या भव्य स्वरूपाचे चित्रण मराठी चित्रपटसृष्टीत आधी कोणत्याही टीझर किंवा ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे 'बागुलबुवा'बद्दल उत्सुकता वाढली आहे.
मराठी चित्रपटाने तंत्रज्ञानातले बदल स्वीकारूनच आजवरची वाटचाल केली आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळातही हे तंत्रज्ञान आत्मसात करून मराठी चित्रपटाची भव्यता वाढवणे शक्य आहे, आणि त्यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्णपणे एआयद्वारे तयार झालेला चित्रपट एवढेच नाही, तर यात आणखीही काही सरप्राइजेस असणार आहेत. त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.