पहिलं बाळ सहज झालं, तरी दुसऱ्या गर्भधारणेत अडचण का येते? तज्ज्ञांनी सांगितली कारणं
पहिली गर्भधारणा लगेच झालेल्या अनेक महिलांना दुसऱ्या वेळी त्रास होतो. त्यामागची कारणं पुण्यातील तज्ज्ञांनी सांगितली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पहिली गर्भधारणा अगदी पटकन झालेली असते, पण दुसऱ्या वेळी अनेक महिलांना त्रास होतो किंवा काही समस्या उद्भवतात. मग "पहिल्यांदा तर लगेच झालं होतं, आता का होत नाही?" असा प्रश्न त्यांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर बाणेर, पुणे येथील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. रश्मी निफाडकर यांनी दिलं आहे.
डॉ. निफाडकर यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या बाळानंतर दुसऱ्या बाळासाठी अनेकदा काही वर्षांचं अंतर असतं. या काळात महिलेचं वय वाढतं. वय वाढलं की स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ लागते. त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
उदाहरणार्थ, वयाच्या २७व्या वर्षी सहज गर्भधारणा झालेल्या महिलेला काही वर्षांनी, म्हणजे ३४ किंवा ३६व्या वर्षी, पुन्हा गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकते. पहिल्यांदा झाली होती म्हणून दुसऱ्यांदा ती सहज होईलच, असं नाही.
पहिल्या बाळानंतर महिलेचं वजन वाढू शकतं. थायरॉईड, मधुमेह, पीसीओएस किंवा इतर हार्मोन्सच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि अंडं तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळेही गर्भधारणेला उशीर होऊ शकतो.
गर्भधारणेसाठी फक्त महिलेचं आरोग्य महत्त्वाचं नसतं, पुरुषांच्या आरोग्याचाही त्यावर परिणाम होतो. वाढतं वय, वजन वाढणं, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव किंवा काही आजारांमुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणून गर्भधारणा होत नसेल, तर महिला आणि पुरुष दोघांचीही तपासणी करणं महत्त्वाचं आहे.
दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यात अडचण येत असेल, तर पहिल्या गर्भधारणेचा आणि प्रसूतीचा इतिहासही पाहिला जातो. प्रसूतीच्या वेळी काही अडचण आली होती का, त्यानंतर कुठला आजार झाला का किंवा शस्त्रक्रिया झाली का, ही माहितीही महत्त्वाची ठरते.
गरजेनुसार मासिक पाळी नियमित आहे का, अंडं तयार होतंय का, स्त्रीबीजांचा साठा किती आहे, गर्भाशय आणि गर्भनलिकांची स्थिती कशी आहे, तसंच पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता कशी आहे, याची तपासणी केली जाऊ शकते. फर्टिलिटी तपासणी म्हणजे लगेच आयव्हीएफ करावं लागेल असं नाही. गर्भधारणा होण्यात नेमकी अडचण कुठे आहे, ते समजून घेण्यासाठी या तपासण्या केल्या जातात.
बराच काळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल, मासिक पाळी अनियमित असेल किंवा महिलेचं वय वाढलेलं असेल, तर योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास वेळ लागतोय याचा अर्थ गर्भधारणा होणारच नाही असा नसतो.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.