नवनाथ बन यांना निलेश राणे यांचे उत्तर: "लायकीत राहायचं", शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये वाद
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादात निलेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद पेटला आहे. राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ही निवडणूक झाली होती (MLC Election Result 2026). त्यात महाविकास आघाडीने पदवीधरच्या तीनपैकी तीनही जागा जिंकल्या, तर सत्ताधारी महायुतीने शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही जागा जिंकल्या. पाचपैकी फक्त दोन जागा मिळाल्यामुळे महायुतीत सध्या अंतर्गत वाद सुरू आहे.
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी असा आरोप केला होता की, पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने साथ दिली नाही, त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेच्या भूमिकेमुळे महायुतीच्या गणिताला सुरुंग लागला, असेही बन यांचे म्हणणे होते. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले होते आणि त्यांनी नवनाथ बन यांना प्रत्युत्तर देण्याचा सपाटा लावला होता.
आता या सगळ्या वादात निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून, त्यातून त्यांनी नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला. "नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती," असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. या टीकेनंतर आता नवनाथ बन राणे यांना प्रत्युत्तर देणार का, हे पाहावे लागेल.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत निर्माण झालेला विसंवाद वाढवू नका, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिली आहे. निवडणुकीतील निकालांचे महायुती म्हणून आत्मपरीक्षण करा आणि झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, असे शिंदे यांनी सांगितले आहे. युतीत वितुष्ट निर्माण होणार नाही आणि अंतर्गत वादाचा फायदा विरोधकांना मिळणार नाही, याची खबरदारी घ्या, असेही त्यांनी सांगितले.
महायुती म्हणून काम करताना झालेल्या चुका आणि त्रुटींचा सविस्तर अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. महायुती समन्वय समिती आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तूर्तास शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर मित्रपक्षांवर टीका करू नये, असेही सांगण्यात आले आहे. विसंवाद टाळून एकजुटीने पुन्हा कामाला लागा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.