कर्जतमध्ये टोरंट प्रकल्पासाठी झाडे तोडू नका, पुनर्रोपण करा; भाजप नेते किरण ठाकरे यांची मागणी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विकासाला विरोध नाही, पण वृक्षतोडीऐवजी झाडांचे पुनर्रोपण व्हावे, अशी मागणी भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट कंपनीच्या साई डोंगर प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीबद्दल आता स्थानिक भाजपनेही आपली भूमिका मांडली आहे. झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची स्थानिक भूमिका स्पष्ट केली.
भीमाशंकर आणि कर्जतच्या साय डोंगररांगांमध्ये टोरंट ग्रीन एनर्जी प्रकल्प होत आहे. त्यासाठी 33 हजार झाडे तोडली जाणार आहेत. त्यातली हजारो झाडे आधीच तोडली गेली असून स्थानिकांनी या वृक्षतोडीला विरोध केला आहे. त्यानंतर प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांनीही विरोध दर्शवला आणि हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही, अशी भूमिका घेतली आहे.
टोरंट कंपनीच्या या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पातून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. हा ग्रीन एनर्जी प्रकल्प असला, तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड चिंतेची बाब आहे, असे कर्जतमधील भाजप नेत्यांनी आज सांगितले. प्रकल्पातून होणाऱ्या विकासाला आमचा विरोध नाही, पण पर्यावरणाचे नुकसान टाळून विकास साधणे गरजेचे आहे, अशी त्यांची भूमिका आहे.
किरण ठाकरे यांनी चीनच्या धर्तीवर झाडांचे प्रत्यारोपण करण्याची पद्धत सरकारने अवलंबावी, असे म्हटले. अमेरिका, जपान आणि चीन यांसारख्या देशांमध्ये झाडे तोडण्याऐवजी ती मुळासकट काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्याचे प्रयोग केले जातात, असे सांगण्यात आले. त्यानंतर चार वर्षे पाणी, आवश्यक औषधोपचार आणि तज्ज्ञांच्या मदतीने त्या झाडांचे संगोपन केले जाते. अशीच पद्धत कर्जतमध्येही वापरावी, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.
याआधी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष वृक्षतोड झालेल्या ठिकाणी जाऊन आपला विरोध दर्शवला होता. महायुतीमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीही वृक्षतोडीला विरोध केला होता.
कर्जत-भीमाशंकर भागातल्या साय डोंगरातील वृक्षतोडीमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिकांनी वृक्षतोडीसोबतच या प्रकल्पासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयालाही थेट विरोध केला आहे. या मुद्द्यावरून स्थानिक सत्ताधाऱ्यांमध्येच मतभेद दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा टोरंट प्रकल्पाला पाठिंबा आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांचा त्याला विरोध आहे.
स्थानिक मेले तरी चालतील, पण स्थानिकांना मारणारे प्रकल्प येऊ द्या, अशी थोरवे यांची भूमिका असल्याची टीका सुधाकर घारे यांनी यापूर्वी केली होती. आता या वादात भाजप नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.