सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 06:57 IST

गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या बैठकीला सर्वांनी हजर राहावे, सतेज पाटील यांचे आवाहन

आमदार सतेज पाटील यांनी 29 तारखेच्या बैठकीला सर्व संचालकांनी उपस्थित राहून गणपूर्ती करावी, असे सांगितले आहे.

गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या बैठकीला सर्वांनी हजर राहावे, सतेज पाटील यांचे आवाहन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या वेगळाच पेच तयार झाला आहे. संचालकांच्या सभेत 14 संचालक उपस्थित असले तरच गणपूर्ती होते. त्यामुळे अध्यक्ष निवडताना हा नियम अडचण ठरेल का, अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर गोकुळमध्ये बहुमत मिळवलेल्या राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडीचे नेते, आमदार सतेज पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सहकारात आदर्श घालून द्यायचा असेल, तर सर्वांनी अध्यक्ष निवडीच्या बैठकीला हजर राहावे, तांत्रिक मुद्द्यांमध्ये अडकू नये आणि लोकांनी दिलेल्या बहुमताचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली.

पाटील म्हणाले की, गोकुळचा निकाल लागला आहे आणि बहुमत आमच्याकडे आले आहे. एका मताने सुद्धा माणूस जिंकू शकतो, असेच असते. 25 संचालक मिळून गोकुळचा कारभार चांगला करतील, हे आपण स्पष्ट केले आहे. सगळे मिळून एकोप्याने संस्था वाढवू आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागू नये, एवढीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सहकारात काम करणारे हसन मुश्रीफ साहेब असतील किंवा विनय कोरे साहेब असतील, उद्या याचा परिणाम महाराष्ट्रात दिसू शकतो, असे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे 29 तारखेच्या बैठकीला सगळेजण उपस्थित राहतील आणि बैठकीची गणपूर्ती करतील, याची आपल्याला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

अध्यक्षपदासाठी निवडणुकीपूर्वीच पाटील यांनी शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव जाहीर केले होते. शशिकांत पाटील चुयेकर हे गोकुळचे संस्थापक चेअरमन, स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव आहेत. ज्यांनी संस्था वाढवली, त्यांचा मुलगा गोकुळचा चेअरमन होणार असेल तर सगळे नीट होईल. सगळेजण काही करणार नाहीत, पण आपण याबाबत सकारात्मक आहोत, असे पाटील यांनी म्हटले आहे.

गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाची निवडणूक 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गेल्या वेळी शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव निश्चित झाले होते, तरीही त्यांना चेअरमनपद मिळाले नव्हते. त्या वेळी अरुण डोंगळे यांनी केलेल्या विश्वासघातकी राजकारणामुळे ते पदापासून दूर राहिले. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये नविद मुश्रीफ यांना चेअरमनपद देण्यात आले होते.

हा घटनाक्रम लक्षात ठेवूनच सतेज पाटील यांनी निवडणुकीत उतरताना शशिकांत पाटील चुयेकर यांना चेअरमनपद देण्याची घोषणा केली होती. त्यांनी अध्यक्षपदासाठी जो गुलाल आणि हार आणला होता, मांडवही घातला होता, तोच गुलाल सत्ता आणून पुन्हा उधळायचा आहे, असे पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकताना म्हटले होते. त्यामुळे आता शशिकांत पाटील यांचे चेअरमनपदाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ