भोरमधील 'आमराई रिसॉर्ट'वर राजगड पोलिसांचा छापा, देहव्यापाराचे रॅकेट उघड, १३ तरुणींची सुटका
वेळू येथील रिसॉर्टमध्ये अवघ्या १००० रुपयांत बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचे उघड झाले. विविध राज्यांतील १३ तरुणींची सुटका झाली असून आरोपी रघु शेट्टीबाबत पोलीस तपास करत आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील वेळू येथील 'आमराई रिसॉर्ट'वर राजगड पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि तिथे चालणारे देहव्यापाराचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत देशातील वेगवेगळ्या राज्यांतील १३ तरुणींची सुरक्षित सुटका करण्यात आली. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, फक्त एक हजार रुपयांचे आमिष दाखवून या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. छाप्यादरम्यान रिसॉर्टमध्ये अवघ्या १००० रुपयांत हा बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचेही निष्पन्न झाले. म्हणजेच एवढ्या कमी पैशांत हा धंदा तिथे राजरोस चालू होता.
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही कारवाई २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साधारण सहा वाजून तीस मिनिटांनी भोर तालुक्यातील वेळू हद्दीतील रिसॉर्टवर करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी रघु शेट्टी हा या रिसॉर्टमध्ये विविध राज्यांतील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची गुप्त आणि खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे राजगड पोलिसांनी नियोजन करून सापळा रचला. आधी एक डमी ग्राहक रिसॉर्टमध्ये पाठवण्यात आला. तिथे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची पूर्ण खात्री पटताच पोलिसांनी एकाच वेळी संपूर्ण रिसॉर्टला वेढा घातला आणि मग छापा टाकला.
पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन पद्धतीने रिसॉर्टची झडती घेतली. तिथे सापडलेल्या १३ पीडित तरुणींची यावेळी सुटका करण्यात आली. या तरुणी मुंबई, ठाणे, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या ठिकाणच्या आहेत.
दरम्यान, हे रिसॉर्ट एका बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण भोर आणि पुणे तालुक्यात सुरू आहे. त्या पदाधिकाऱ्याने रिसॉर्ट चालवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने दिले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
रिसॉर्टचे मुख्य मालक नेमके कोण आहेत आणि या रॅकेटचे जाळे आणखी कुठे पसरले आहे, या सर्व बाजूंनी राजगड पोलीस कसून तपास करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.