सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 06:56 IST

भोरमध्ये १४ वर्षांच्या चुलत बहिणीवर अत्याचार; ससूनमधील प्रसूतीनंतर प्रकार उघड

दोन अल्पवयीन चुलत भावांविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक अतिशय संतापजनक आणि मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. दोन अल्पवयीन चुलत भावांनी आपल्याच १४ वर्षांच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या अत्याचारानंतर ती मुलगी गर्भवती राहिली होती. पुण्यातील ससून सामान्य रुग्णालयात तिची प्रसूती झाल्यानंतरच हे सगळे बाहेर आले. या घटनेमुळे भोर तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे आपापसात चुलत भाऊ-बहीण आहेत. हे दोन्ही चुलत भाऊ तिच्या घराशेजारीच राहतात. यंदाच्या जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी हे विकृत कृत्य केले. त्यांनी १४ वर्षांच्या मुलीला घराशेजारच्या माळरानावर जबरदस्तीने नेले आणि तिथे तिच्यावर दोन ते तीन वेळा बळजबरीने अत्याचार केला.

या प्रकारानंतर मुलगी प्रचंड घाबरून गेली होती. आरोपींच्या धमकीमुळे आणि मनात बसलेल्या भीतीमुळे तिने आजपर्यंत हे कोणालाही सांगितले नव्हते. पुढे या अत्याचाराचे गंभीर परिणाम दिसू लागले आणि ती गर्भवती राहिली.

काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली आणि पोटात खूप दुखू लागले. त्यामुळे तिला उपचारासाठी पुण्यातील ससून सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणी करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना ती गरोदर असल्याचे आणि तिची प्रसूती सुरू असल्याचे लक्षात आले.

एका अल्पवयीन मुलीची प्रसूती होत असल्याचे पाहून रुग्णालयातील डॉक्टरांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी सतर्कता दाखवत या गोष्टीची गंभीर दखल घेतली आणि लगेच भोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सगळी माहिती दिली.

ससून रुग्णालयातून माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे तपास पथक तातडीने पुण्यात पोहोचले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित अल्पवयीन मुलीचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. तिच्या फिर्यादीवरून दोन्ही अल्पवयीन चुलत भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोर पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील दोषी भीमराव कांबळे याला न्यायालयाने नुकतीच फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्या घटनेचे पडसाद अजूनही ताजे असतानाच भोर तालुक्यातून पुन्हा अशीच संतापजनक घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ