दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

अजितदादांशिवाय पवार कुटुंबाची पहिली दिवाळी, राजेंद्र पवारांच्या पोस्टमधून जुन्या आठवणी जाग्या

अजितदादांशिवाय पवार कुटुंबाची पहिली दिवाळी, राजेंद्र पवारांच्या पोस्टमधून जुन्या आठवणी जाग्या
अजित पवार | संग्रहित छायाचित्र | Lokmat Times
कल्चर PT24 टीम

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय कुटुंबाची ही पहिलीच दिवाळी आहे. बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी लिहिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं यंदा जानेवारीत निधन झालं. त्या धक्क्यातून पवार कुटुंब अजून सावरलेलं नाही, आणि आता त्यांच्याशिवाय येणारी पहिली दिवाळी घरात हुरहूर घेऊन आली आहे. याच निमित्ताने त्यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ती सध्या खूप चर्चेत आहे.

राजेंद्र पवार हे एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख आहेत, तसंच बारामती ॲग्रोचे अध्यक्षही आहेत. अजितदादांचे ते मोठे चुलत भाऊ. पोस्ट थेट अजित पवारांना उद्देशून लिहिलेली असून सोबत त्यांनी एक जुना व्हिडीओही शेअर केला आहे.

यंदा दिवाळी साजरी करायची नाही, असं शरद पवार यांनी आधीच माध्यमांसमोर सांगितलं होतं. अजितदादांशिवायचा हा पहिलाच सण आणि घरावर मोठं दुःख, म्हणून हा निर्णय. बारामतीतल्या गोविंदबागेत दरवर्षी दिवाळी पाडव्याला मोठी गर्दी असते. राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते शरद पवारांना भेटायला येतात. यंदा ही वर्षानुवर्षांची परंपरा खंडित होणार आहे.

पोस्टच्या सुरुवातीला राजेंद्र पवार म्हणतात, "अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी वाटतेय. लहानपणापासूनच्या एकत्रित दिवाळ्या खूप जिव्हाळ्याच्या होत्या." पुढे ते आमराईतल्या दिवसांकडे वळतात.

फटाक्यांचा किस्सा त्यांनी रंगवून सांगितला आहे. अनंतराव, म्हणजे तासेब, फटाके आणून सगळ्या पोरांना सारखे वाटायचे. ते दिवसभर पुरावेत म्हणून अंधाऱ्या कोठडीतल्या घडवंचीवर ठेवलेल्या पोत्याच्या भकश्यात दडवले जायचे, म्हणजे कोणाच्या हाताला लागू नयेत. पॅराशूट वर उडालं की ते पकडायला काट्याकुट्यातून पळावं लागायचं. अर्धवट उडालेल्या फटाक्यांतली दारू गोळा करून दुसऱ्या दिवशी पुन्हा उडवली जायची.

घरात आजीचा चांगलाच धाक होता, त्यामुळे सगळे शिस्तीत वागायचे. "आज तू असतास तर वेगळा धाक आणि प्रेम राहिलं असतं", असंही ते अजितदादांना उद्देशून म्हणतात. दिवाळीला एन. डी. पाटील घरी आले की गप्पांनी घर भरून जायचं. त्यांना राजेंद्र पवार आत्यामुळे मामा मानतात. पाटील यांचा पक्ष आणि तत्त्वं वेगळी होती, तरी लहानथोर सगळ्यांशी त्यांचं छान जमायचं. पक्ष आणि विचार वेगळे असले तरी नाती जपता येतात, हे त्यांच्याकडूनच शिकल्याचं पवार लिहितात.

तेव्हाच्या अडचणींचाही उल्लेख आहे. इतक्या पाहुण्यांसाठी टोपलीचा एकच संडास होता, मग लहान मुलांना पत्र्याच्या आडोशाला रांगेत बसून पुढे सरकत राहावं लागे. त्या अनुभवामुळे पुढे कोणाशीही जुळवून घेणं सोपं गेलं, असं ते म्हणतात. घरामागच्या आडावरून अर्धी आमराई पाणी भरायची, आणि पहाटेपासून कावडींचे कुई-कुई आवाज सुरू व्हायचे. राखेने दात घासण्याचे ते दिवस होते. आपल्याकडे जे आहे त्यात समाजाचाही वाटा असतो, ही शिकवण मागच्या पिढीने दिली. घरट्यातून खाली पडलेली पक्ष्यांची पिल्लं सापडली की भटकत्या शेळीचं दूध काढून त्यांना पाजलं जायचं, हीही आठवण त्यांनी सांगितली.

अजितदादांच्या कपड्यांच्या आवडीविषयीही ते लिहितात. राजेश खन्ना स्टाइलचे कपडे घरात फक्त त्यांच्याकडेच असायचे.

पोस्टमधला भावनिक भाग पुढे येतो. "दिवाळ्या येत-जात राहणार; मात्र लहानपणीच्या आठवणींचे काटे आता एकटेपणाची जाणीव करून देत राहणार." राजेंद्र पवार शेती करत बारामतीतच राहिले आणि त्यांची मुलंही तिथेच आहेत. अजितदादा आणि इतर भावंडं मुंबईला गेली, त्यांची मुलं तिथेच जन्मली, मोठी झाली आणि काही जण परदेशात शिकले. या नव्या पिढ्यांना लहानपणीच्या त्या एकत्र दिवाळीतली आपुलकी, नात्यांची घट्ट वीण आणि ऋणानुबंधांचे हळवे धागे कसे कळणार, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

शेवटी त्यांनी लिहिलं आहे, "प्रत्येक प्रसंगात आठवण काढणे एवढेच मागे राहिले आहे", आणि खाली सही केली आहे "राजुदादा". एका पिढीचं हरवलेलं एकत्र बालपण या पोस्टमधून समोर आलं आहे, आणि ती वाचून अनेकांना अजितदादांची आठवण येत आहे.

#पुणे#कल्चर#PT24#Culture#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ