अजितदादांविना पहिली दिवाळी: राजेंद्र पवार यांनी जागवल्या लहानपणीच्या आठवणी
अजित पवार यांच्या निधनानंतरची पहिली दिवाळी सुनी वाटते, असं राजेंद्र पवार यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. लहानपणी एकत्र साजऱ्या केलेल्या दिवाळ्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जानेवारी महिन्यात निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे आणि पवार कुटुंबीय अजूनही दुःखात आहेत.
यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचं शरद पवार यांनी याआधी माध्यमांसमोर सांगितलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवारांशिवाय येणारा हा पहिलाच सण आहे आणि कुटुंबावर मोठं दुःख असल्यानं पवार कुटुंबीय यावर्षी दिवाळी साजरी करणार नाहीत.
पवार कुटुंबाची दिवाळी राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय असते. दरवर्षी बारामतीतील गोविंदबागेत दिवाळी पाडवा साजरा होतो. त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळी शरद पवार यांना भेटायला येतात. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा या परंपरेत खंड पडणार आहे.
या पार्श्वभूमीवर कुटुंबातूनही प्रतिक्रिया आली आहे. एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आणि सोबत एक जुना व्हिडीओही शेअर केला. आमराईतील लहानपणीच्या आठवणींपासून ते कुटुंबातलं वातावरण आता दूर होत चाललं आहे, इथपर्यंत अनेक गोष्टी त्यांनी पोस्टमध्ये मांडल्या.
राजेंद्र पवार यांनी लिहिलं, "अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी वाटतेय. लहानपणापासूनच्या एकत्रित दिवाळ्या खूप जिव्हाळ्याच्या होत्या." तासेब (अनंतराव) फटाके आणायचे आणि सर्वांना समान वाटून द्यायचे, असं त्यांनी सांगितलं. फटाके दिवसभर पुरावेत म्हणून अंधाऱ्या कोठडीतल्या घडवंचीवर ठेवलेल्या पोत्याच्या भकश्यात ते लपवले जात, जेणेकरून कोणाला सापडू नयेत.
नवीन पॅराशूट उडालं की ते पकडण्यासाठी काट्या-कुट्यातून धावत सुटत असू, तसंच अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू गोळा करून दुसऱ्या दिवशी पेटवत असू, अशी आठवण त्यांनी लिहिली. आजीच्या धाकामुळे घरातले सगळे सुतासारखे सरळ वागत, आणि आज तू असतास तर वेगळा धाक आणि प्रेम राहिलं असतं, असंही ते म्हणतात.
दिवाळीला एन. डी. पाटील (आत्यामुळे मामा) आले की घर गप्पांनी भरून जाई. ते वेगळ्या पक्षाचे आणि स्वतःच्या वैयक्तिक तत्त्वांचे होते, तरी प्रत्येक वयातल्या माणसाशी त्यांचं जमायचं. पक्ष आणि तत्त्व वेगळं ठेवून नाती जपायची असतात, हे त्यांच्याकडून शिकलो, असं राजेंद्र पवार यांनी लिहिलं.
त्या काळी एवढ्या पाहुण्यांसाठी टोपलीचा एकच संडास होता, त्यामुळे लहान मुलांना पत्र्यामागे रांगेत बसावं लागे आणि पुढे-मागे सरकावं लागे. या अनुभवामुळे पुढे कोणाशीही जमवून घेणं सोपं गेलं, असं त्यांनी म्हटलं. घरामागच्या आडावरून अर्धी आमराई पाणी भरायची आणि पहाटेपासून कावडीचे कुई-कुई आवाज चालू असत. आपल्याकडे जे काही असतं त्यात समाजाचाही वाटा असतो, ही शिकवण मागच्या पिढीने दिली, असं ते सांगतात. घरट्यातून पडलेली पक्ष्यांची पिल्लं सापडली की फिरस्त्या शेळीचं दूध काढून त्यांना पाजत असत, अशीही आठवण त्यांनी दिली.
अजित पवार यांना उद्देशून त्यांनी लिहिलं की, कपड्यांची वेगळी आवड असल्यामुळे राजेश खन्ना स्टाइलचे कपडे फक्त तुलाच होते. दिवाळ्या येत-जात राहतील, पण लहानपणी टोचलेल्या काट्यांच्या आठवणींच्या खुणा आता बोचून एकटेपणा देत राहतील.
मी शेती करत बारामतीत राहिलो आणि माझी मुलंही इथंच राहिली, असं राजेंद्र पवार यांनी लिहिलं. तुम्ही भावंडं मुंबईला गेलात, तुमची मुलं तिथंच जन्मली, वाढली आणि परदेशात शिकली. या पुढच्या पिढ्यांना आपली लहानपणीची आपुलकीची दिवाळी कशी समजणार, आपल्या नात्यातली घट्ट वीण आणि ऋणानुबंधाचे हळवे धागे कसे समजणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. "प्रत्येक प्रसंगात आठवण काढणे एवढेच मागे राहिले आहे", असं म्हणत त्यांनी पोस्टच्या शेवटी "राजुदादा" असं लिहिलं आहे.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.