पुण्यात सफाईत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना दहापट दंड, बायोमेट्रिक हजेरीची तयारी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुणे महापालिका सफाईच्या नव्या निविदांच्या अटी बदलत आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना सध्यापेक्षा दहापट दंड होणार आहे. बायोमेट्रिक हजेरी आणि जिओ-टॅग फोटोंनी कामावर लक्ष ठेवले जाणार आहे.
पुणे शहरातील रस्ते सफाईच्या कामात होणारी दिरंगाई, कर्मचाऱ्यांची खोटी हजेरी आणि प्रत्यक्षात काम न करता कागदावर काम पूर्ण दाखवून बिले काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्याची तयारी केली आहे. सफाईच्या कामांसाठी नव्याने तयार होणाऱ्या निविदांच्या अटी व शर्तींमध्ये मोठे बदल केले जात आहेत.
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना सध्यापेक्षा दहापट दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय बायोमेट्रिक हजेरी आणि जिओ-टॅग फोटोंच्या मदतीने कर्मचारी प्रत्यक्ष किती आहेत आणि कामाची खरी स्थिती काय आहे, हे तपासले जाणार आहे. ही माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली. सफाई व्यवस्थेत ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करणे आणि कामाच्या दर्जावर प्रभावी नियंत्रण ठेवणे, हा नव्या अटींमागचा मुख्य हेतू आहे.
आतापर्यंत सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी, प्रत्यक्षात उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि कामाचा दर्जा याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. काही ठेकेदार कागदावर कर्मचाऱ्यांची संख्या आणि हजेरी दाखवतात, पण प्रत्यक्ष कामाच्या जागी गरजेइतके कर्मचारी नसतात. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
दंडाच्या रकमेत सध्याच्या तुलनेत दहापट वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. एखाद्या चुकीसाठी आधी एक हजार रुपये दंड आकारला जात असेल, तर तो आता दहा हजार रुपयांपर्यंत वाढवला जाणार आहे. ठेकेदारांनी ठरलेल्या वेळेत आणि अपेक्षित दर्जाप्रमाणे काम करावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.
नव्या निविदेतील अटींनुसार ठेकेदारांची बिले देण्यासाठी किमान ८५ टक्के कर्मचारी हजर असणे बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे. ठरलेली हजेरी पूर्ण झाली नाही, तर संबंधित ठेकेदारांची बिले देण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याची तयारी चालू आहे. त्यामुळे कर्मचारी प्रत्यक्ष हजर असल्याची नोंद मिळेल आणि खोटी हजेरी दाखवण्याला आळा बसेल.
सफाईच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सुपरवायझरना मोबाइल अॅप देण्याची योजना आहे. या अॅपवरून सफाईच्या जागीच फोटो काढून तो अपलोड करणे बंधनकारक असेल. फोटोसोबत जिओ-टॅग नोंदवला जाणार असल्याने कर्मचारी किंवा यंत्रसामग्री नेमकी कुठे आहे, हे कळू शकेल. मोबाइलच्या गॅलरीत आधीपासून असलेले जुने फोटो अपलोड करता येणार नाहीत. त्यामुळे काम न करता जुने फोटो किंवा कागदपत्रांच्या आधारे काम झाल्याचे दाखवण्याचे प्रकार थांबतील.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.