बारामतीत १५८ मिमी पावसानंतर दोन तासांत रस्त्यांवरील पाणी ओसरले, वाहतूक सुरळीत
सोमवारी सकाळी सातपर्यंत बारामतीत १५८ मिमी पावसाची नोंद झाली. नगरपरिषदेच्या यंत्रणेने दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा केला.
बारामती शहरात सोमवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी सात वाजेपर्यंत तब्बल १५८ मिमी पावसाची नोंद झाली आणि शहरातील सखल भागांत पाणी साचले. तरीही बारामती नगरपरिषदेच्या यंत्रणेने अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
पहाटेपासूनच पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचले. मुख्य भिगवण रस्त्यासह इतर प्रमुख मार्गांवर पाण्याचे लोट वाहू लागल्याने वाहतुकीचा प्रश्न उभा राहिला. सकाळी कामावर किंवा इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ शकते, हे लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने लगेच उपाययोजना सुरू केल्या.
पावसाचा जोर आणि शहरातील परिस्थिती कळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि आवश्यक सूचना दिल्या. नगराध्यक्ष सचिन सातव आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. सखल भागांतील पाण्याचा निचरा करणे आणि वाहतूक सुरळीत करणे, यावर भर देण्यात आला. खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांनीही प्रशासनाला काही सूचना केल्या. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या दोघांच्या सूचनांनुसार प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने हालचाली केल्या.
नगराध्यक्ष सचिन सातव आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह नगरसेवक, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर हजर राहिले आणि कामाला वेग दिला. पाणी काढून टाकणे, रस्त्यांवरील अडथळे बाजूला करणे आणि वाहतूक सुरळीत करणे, या कामांसाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक विभाग यांच्याशी समन्वयही साधण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील परिस्थिती पूर्वपदावर आली.
या निमित्ताने स्वर्गीय अजित पवार यांनी रुजवलेल्या कार्यसंस्कृतीचीही आठवण निघाली. बारामतीच्या विकासाबरोबरच प्रशासनात तत्परता, शिस्त आणि नागरिकांच्या प्रश्नांबद्दलची बांधिलकी त्यांनी रुजवली होती. संकटाच्या वेळी तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देण्याची तीच परंपरा यावेळी पुन्हा दिसून आली, असे यातून अधोरेखित झाले. पावसाचे संकट मोठे होते, तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला.
१५८ मिमी पाऊस, सखल भागांतील साचलेले पाणी आणि वाहतुकीसमोरचे आव्हान असतानाही प्रशासनाने दाखवलेली तत्परता लक्षवेधी ठरली. संकट कितीही मोठे असले, तरी नागरिकांच्या मदतीसाठी बारामतीची यंत्रणा तयार आहे, असा संदेश या कामगिरीतून मिळाला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.