रोहन गुजर आणि केतकी पालव 'आमने सामने' नाटकातून बाहेर, मानधनाच्या मागणीवरून काढल्याचा दावा
'आमने सामने' या नाटकातून रोहन गुजर आणि केतकी पालव यांना अचानक वगळण्यात आलं. इन्स्टाग्रामवरच्या व्हिडीओतून त्यांनी ही माहिती दिली आणि शेवटचा प्रयोग नीट अनुभवता आला नाही याची खंत व्यक्त केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मराठी रंगभूमीवर सध्या चर्चेत असलेल्या 'आमने सामने' या नाटकातून रोहन गुजर आणि केतकी पालव यांना अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आपल्याला नाटकातून रिप्लेस करण्यात आल्याची माहिती दिली. नाटकातून अशा पद्धतीने काढल्यामुळे शेवटचा प्रयोगही एन्जॉय करता आला नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
रोहन आणि केतकी यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ टाकला आहे. त्यात ते म्हणतात, "आता भेटूयात आमने-सामने हे वाक्य आम्ही कधीच बोलू शकणार नाही. कारण यापुढे आम्ही दोघंही आमने सामने नाटकाचा भाग नसणार आहोत."
रोहनने सांगितलं की तो गेली सात-आठ वर्षं हे नाटक करतोय आणि त्याने आतापर्यंत तब्बल ६७० प्रयोग केले आहेत. केतकी साडेतीन वर्षं या नाटकात काम करत आहे आणि तिने ५२० प्रयोग केल्याचं सांगितलं. इतक्या वर्षांनंतरही त्यांना एक छान गुडबायही दिला गेला नाही, असं दोघांचं म्हणणं आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे १८ ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिर येथे नाटकाचा प्रयोग झाला. तो संपल्यावर एक मीटिंग झाली आणि त्यानंतर "हा तुमचा शेवटचा प्रयोग होता" असं त्यांना सांगण्यात आलं.
"२५-२५ वेळा येऊन लोकांनी हे नाटक पाहिलं आहे. आम्हाला नाटकाला शेवटचा गुडबाय म्हणता आला नाही आणि शेवटचा प्रयोगही एन्जॉय करता आला नाही," अशी खंत दोघांनी व्यक्त केली. रोहनच्या बाबांनी हे नाटक ११ वेळा पाहिलं आहे. हा शेवटचा प्रयोग आहे हे कुटुंबाला आधी माहीत असतं, तर तेही तो पाहायला आले असते, असंही त्यांनी म्हटलं.
कोणतीही पूर्वकल्पना न देता नाटकातून काढून टाकण्यात आल्याचं केतकी आणि रोहन यांनी सांगितलं. पैसे, म्हणजेच मानधन वाढवून मागितल्यामुळे आपल्याला काढण्यात आलं, असा त्यांचा दावा आहे.
रोहनने सांगितलं की कोव्हिडच्या काळात नाटक दोन वेळा बंद पडलं. तेव्हा अर्धं मानधन घेऊन त्यांनी नाटकाचे प्रयोग केले. निर्मात्यांमधल्या वादामुळेही 'आमने सामने' काही काळ बंद होतं, तरीही आपण या नाटकाचे प्रयोग केले, असंही तो म्हणाला.
प्रेक्षकांनी या नाटकावर जे प्रेम केलं त्याबद्दल दोघांनी आभार मानले. आता नाटकात दिसणार नसल्यामुळे शेवटी रोहन आणि केतकी यांनी प्रेक्षकांची माफीही मागितली.
या दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेक मराठी कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता आस्ताद काळे म्हणाला, "खरं कारण माहीत आहे, जे कळल्यानंतर मलाही संताप आला होता. तुमचं काय झालं असेल?" याशिवाय मयुरी देशमुख, अपूर्वा नेमळेकर, शशांक केतकर, ऋतुजा बागवे, सुकन्या मोने, स्पृहा जोशी, ऋचा आपटे आणि विकास पाटील यांनीही या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.