औंध संगीत महोत्सव ३० ऑक्टोबरला: कशाळकर, तळवलकरांसह दिग्गजांची तीन सत्रांत मैफल
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे ८६ वा औंध संगीत महोत्सव शुक्रवारी, ३० ऑक्टोबरला होणार आहे. गायन, वादन आणि कथ्थक नृत्य अशा तीन सत्रांत कार्यक्रम रंगेल.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रसिकांना ज्याची आतुरता लागली होती, तो ८६ वा औंध संगीत महोत्सव शुक्रवारी, ३० ऑक्टोबरला होणार आहे. पद्मश्री पं. उल्हास कशाळकर आणि पं. सुरेश तळवलकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचे गायन आणि वादन ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळेल. ही माहिती शिवानंद संगीत प्रतिष्ठानच्या विश्वस्त श्रीमती अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांनी दिली.
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा महोत्सव भरवला जातो. ग्रामीण भागात गेली ८५ वर्षे तो न थांबता सुरू आहे. देशातील महत्त्वाच्या महोत्सवांपैकी तो एक आहे. १९४० साली औंध संस्थानचे दरबारी गायक पं. अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा आणि त्यांचे चिरंजीव, व्हायोलिन वादक पं. गजानन बुवा जोशी या पितापुत्रांनी त्याची सुरुवात केली. पुढे त्याचे स्वरूप वाढत गेले आणि १९८१ साली पं. गजानन बुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली.
या महोत्सवात आजवर पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी, श्रीमती रोहिणी भाटे, गिरिजादेवी, पं. के. जी. गिंडे, सुलतान खाँसाहेब, पं. मधुकर जोशी, यशवंत बुवा जोशी, अश्विनी भिडे-देशपांडे, योगेश समसी, पं. वेंकटेश कुमार, निलाद्रीकुमार, शुभा मुद्गल यांच्यासह पद्मश्री पं. उल्हास कशाळकर आणि पद्मश्री पं. सुरेश तळवलकर अशा अनेक ज्येष्ठ कलाकारांनी हजेरी लावली आहे. औंधच्या कलाप्रेमी राजघराण्याचा आशीर्वादही सुरुवातीपासून या महोत्सवाला लाभला आहे. जोशी कुटुंबातील नव्या पिढीने आयोजनाची जबाबदारी उचलली असून, शास्त्रीय संगीताचा वारसा जपण्याचा प्रयत्न पल्लवी जोशी आणि अपूर्वा गोखले करत आहेत. गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही प्रकारांचे सादरीकरण इथे होते, तसेच अनेक तरुण कलाकारांना आपली कला मांडण्यासाठी व्यासपीठ दिले जाते.
महोत्सव तीन सत्रांत होईल. सकाळी ९ वाजता किर्लोस्कर ग्रुप कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रविंद्र सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रशासक व ग्रामविकास अधिकारी चाॅदशा काझी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित असतील. संस्थेचे अध्यक्ष पं. अरुण कशाळकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल प्रमुख पाहुणे रवींद्र सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल.
पहिल्या सत्राची सुरुवात युवा गायिका प्रिया पुरूषोत्तमन यांच्या गायनाने होईल. त्यानंतर ज्येष्ठ संवादिनीवादक पं. विश्वनाथ कान्हेरे संवादिनीवादन सादर करतील. पं. गजाननबुवा जोशी यांच्या नाती आणि प्रसिद्ध गायिका अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी सहगायन करतील. या सत्राची सांगता ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. त्यांना तबलासाथ ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर करतील.
दुपारी ३.१५ वाजता दुसरे सत्र सुरू होईल. त्यात आधी युवागायक अनिरुद्ध ऐताळ गातील, मग प्रसिद्ध तबलावादक अनीश प्रधान यांचे एकल तबलावादन होईल. त्यानंतर ज्येष्ठ गायक पं. अरुण कशाळकर यांचे गायन श्रोत्यांना ऐकता येईल. महोत्सवानिमित्त प्रकाशित होणाऱ्या रियाझ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवर पाहुणे आणि औंध ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत होईल. पं. विकास कशाळकर यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त संस्थेतर्फे त्यांचा सत्कारही केला जाईल.
रात्री १० वाजता तिसरे आणि शेवटचे सत्र निखिल परिहार यांच्या कथ्थक नृत्याने सुरू होईल. प्रसिद्ध बासरीवादक प्रविण गोटखिंडी बासरी वाजवतील, तर पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य कृष्णा साळुंके पखवाज सादर करतील. किराणा घराण्याचे गायक अंबरीश दास यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल.
पूर्ण महोत्सवात तबलासाथ सुमित नाईक, यति भागवत, यशवंत वैष्णव आणि स्वप्निल भिसे करतील. संवादिनीसाठी चिन्मय कोल्हटकर, सिद्धेश बिचोलकर व सुयोग कुंडलकर साथ देतील. कथकसाठी ईशान परांजपे, पार्थ भुमकर, अथर्व वैरागकर आणि स्वानंद राजोपाध्ये साथ करतील. महोत्सव सर्व संगीत रसिकांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त श्रोत्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांनी केले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.