टायगर श्रॉफ यांच्या आईने केईएम रुग्णालयात जाऊन जखमी उमेश चौहान यांना दिले आर्थिक मदतीचे आश्वासन
गोळीबारात जखमी झालेले कंटेंट क्रिएटर उमेश चौहान यांची आयेशा श्रॉफ यांनी मंगळवारी भेट घेतली. हल्लेखोरांचे खरे लक्ष्य वेगळेच होते, अशीही माहिती पुढे आली आहे.
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मोठे खुलासे होत असून आता आणखी माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात गोळीबारात जखमी झालेले कंटेंट क्रिएटर उमेश चौहान यांची टायगर यांच्या आई आयेशा श्रॉफ यांनी मंगळवारी केईएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
या भेटीत आयेशा श्रॉफ यांनी चौहान यांना लागणाऱ्या आर्थिक मदतीचे आश्वासन दिले, अशी माहिती मिळत आहे. तसेच त्यांनी चौहान यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. गोळीबारातील पीडित असलेल्या चौहान यांना अशा प्रकारे श्रॉफ कुटुंबाकडून धीर देण्यात आला आहे.
चौहान हे मानखुर्द येथील व्लॉगर आहेत. टायगर श्रॉफ फुटबॉल खेळून परतल्यानंतर चौहान त्यांचे व्हिडीओ काढत होते. हल्ला झाला तेव्हा ते तिथेच होते. त्या वेळी श्रॉफ ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीजवळ त्यांना एक आवाज ऐकू आला. सुरुवातीला गाडीचा टायर फुटला असावा आणि त्यामुळे धूर पसरून मोठा आवाज झाला असावा, असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना गुदमरल्यासारखे वाटू लागले.
आपल्याला हृदयविकाराचा झटका येत असावा, असे वाटल्याने त्यांनी आपल्या मित्रांना छातीवर दाब द्यायला सांगितले. नंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या छातीत गोळी घुसली आहे. मित्रांनी त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात नेले. तिथून त्यांना केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले असून सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हल्लेखोरांचे खरे लक्ष्य टायगर श्रॉफ नव्हते, अशी मोठी माहिती पुढे आली आहे. मोठे कलाकार त्यांच्या निशाण्यावर होते. मात्र अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या घरांची सुरक्षा पाहून त्यांनी काही बदल केले आणि आपला मोर्चा टायगर श्रॉफ यांच्याकडे वळवला.
सात दिवसांच्या रेकीनंतर जुहू येथे टायगर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. गाडीच्या आजूबाजूला लोक मोठ्या संख्येने असतानाही गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात चौहान जखमी झाले. आता आयेशा श्रॉफ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली असून, त्यांना मदतीचे आश्वासनही दिले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.