शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं, निलेश राणे यांची भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर पोस्ट
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निकालानंतर महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला असताना शिवसेना नेते निलेश राणे यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे नाव घेऊन सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. राज्यात तब्बल 45 तास मतमोजणी सुरू होती. सर्वात शेवटी नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागला. जिथे भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने बाजी मारली.
या निकालातही महायुती वरचढ ठरेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र उलटे घडले. महाविकास आघाडीने या निवडणुकीत मोठी बाजी मारली. पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीला आणि दोन जागा महायुतीला मिळाल्या. हा महायुतीसाठी धक्का आहे. पुण्यासह नागपूरमध्येही भाजपाला धक्का बसला.
निकालानंतर भाजपाने शिवसेना शिंदे गटाकडे बोट दाखवले. मित्र पक्षाने सहकार्य केले नाही, त्यामुळे आपला पराभव झाला, असे भाजपाने म्हटले. विधान परिषदेच्या या निवडणुकीमुळे महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे नेते जाहीरपणे शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत. रवींद्र धंगेकर यांनीही यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. भाजपाने पुण्यात खंडणीखोर उमेदवार दिला, असे धंगेकर यांनी म्हटले.
दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले असताना शिवसेना नेते निलेश राणे यांनी याआधी एक विधान केले होते. पदवीधर निवडणुकीच्या पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडू नका, असे ते म्हणाले होते. एवढेच नाही, तर नवनाथ बन यांची असे बोलण्याची ताकद नाही, त्यांच्या तोंडून कोणी बोलायला लावत आहे का, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता निलेश राणे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमधून त्यांनी थेट भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे नाव घेतले. राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती." राणे यांची ही पोस्ट 30 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आली असून ती आता व्हायरल होत आहे. नवनाथ बन यांच्याकडून शिवसेना शिंदे गटावर टीका केली जात आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांचे निकाल लागल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी या पराभवासाठी शिवसेनेला जबाबदार धरले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर शिवसेना नेते निलेश राणे यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी राणे यांनी थेट इशाराही दिला होता. बिनबुडाचे आरोप करून युतीत मिठाचा खडा टाकू नका, शिवसेनेवर बोलाल तर शिवसेनेसारखेच उत्तर मिळेल, असे त्यांनी म्हटले होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.