पुणे, भिवंडीतील धाडी एफडीए अधिकाऱ्यांना भोवणार: आणखी सहा जणांच्या निलंबनाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कार्यक्षेत्राबाहेर धाडी टाकल्याने एफडीएचे २६ अधिकारी अडचणीत आले आहेत. सहा जणांचे निलंबन होणार असून २० जणांची विभागीय चौकशी होणार आहे.
पुणे आणि भिवंडीत टाकलेल्या धाडींचे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत. एफडीएच्या आणखी सहा अधिकाऱ्यांचे निलंबन होण्याची शक्यता असून, सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार या सहा जणांच्या निलंबनाच्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
कार्यक्षेत्राबाहेर जाऊन धाडी टाकल्याने एफडीएचे एकूण २६ अधिकारी अडचणीत आले आहेत. त्यापैकी सहा जणांवर निलंबनाची कारवाई होणार आहे, तर उरलेल्या २० अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणजेच एकूण २६ अधिकाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे. याआधीच सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. आता मुख्यमंत्र्यांनीही या कारवाईवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांत पुणे आणि भिवंडीत या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर असतानाही रेड केली होती. ज्या कंपनीवर ही रेड झाली, ती टोबॅको कंपनी असून ती केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. तरीही महाराष्ट्राच्या एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ही रेड केली. हे सगळे प्रकरण कोर्टापासून थेट दिल्लीपर्यंत गेले होते आणि त्यानंतर आता ही कारवाई होताना दिसते आहे. कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते हे माहीत असूनही अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे ही रेड केली, ती अनधिकृत होती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा ठपका ठेवण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी सुपारी प्रकरण समोर आले होते, त्यात जवळपास पाच अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता तब्बल २६ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. एफडीएमधील आतापर्यंतचे हे सगळ्यात मोठे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. यातील सर्व जण वरिष्ठ अधिकारी आहेत आणि या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ही कारवाई होताना पाहायला मिळते आहे.
एकीकडे एफडीए हॉटेल्स किंवा इतर वस्तूंवर कारवाई करताना दिसते, मात्र काही अनधिकृत आणि बेकायदेशीर रेड झाल्याने आता त्याच विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. आज दुपारपर्यंत कदाचित या सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेशही मंत्री कार्यालयातून निघण्याची शक्यता आहे.
हे सर्व अधिकारी पुणे आणि मुंबईतील आहेत. यात मंत्री कार्यालयाचे काही अधिकारी असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, त्यामुळे त्यांचीही नावे समोर येतात का, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. तुकाराम मुंडे आणि मंत्री नरहरी झिरवळ हे दोघेही विभागांतर्गत कारवाईसाठी ऍक्शन मोडवर आलेले दिसत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.