सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 114 | Moderate 08:42 IST

नाशिकमध्ये राज्यातील पहिले धान्य एटीएम सुरू, २४ तास मिळणार रेशनचे धान्य

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने नाशिक शहरात पथदर्शी योजनेतून राज्यातील पहिले धान्य एटीएम सुरू केले आहे.

नाशिकमध्ये राज्यातील पहिले धान्य एटीएम सुरू, २४ तास मिळणार रेशनचे धान्य छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गरीब आणि दुर्बल घटकातील नागरिकांना सरकार मोफत शिधा देते. आता शिधापत्रिकाधारकांना त्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. नाशिक शहरात राज्यातील पहिले धान्य एटीएम सुरू झाले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा उपक्रम राबवला आहे.

बँकेच्या एटीएमसारखेच या मशीनमधून लाभार्थ्यांना २४ तास, सहज आणि पारदर्शकपणे रेशनचे धान्य मिळणार आहे. नाशिकमधील पथदर्शी योजनेअंतर्गत हे मशीन सुरू करण्यात आले असून ते आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. गहू, तांदूळ आणि इतर धान्य थेट लाभार्थ्याच्या पिशवीत पडते.

धान्य कसे मिळते, ते तीन टप्प्यांत पाहता येईल. पहिला टप्पा बायोमॅट्रिक पडताळणीचा आहे. लाभार्थ्याला सर्वात आधी मशीनवर आपला आधार क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर अंगठा लावला की बायोमॅट्रिक पद्धतीने त्याची ओळख पटवली जाते.

दुसरा टप्पा मोजून धान्य देण्याचा आहे. लाभार्थ्याला किती धान्य मंजूर आहे, ही माहिती मशीनमध्ये आधीच भरलेली असते. त्यामुळे मशीन स्वयंचलित पद्धतीने तोलून तितकेच धान्य देते. ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होते.

तिसरा टप्पा झटपट पिशवीत धान्य पडण्याचा आहे. या संपूर्ण प्रक्रियेला फारतर एक मिनिट लागतो आणि त्यात मशीन २५ ते ३० किलो धान्य देते.

रेशनमधील काळाबाजार काही नवीन नाही. बोगस लाभार्थ्यांच्या नावावर धान्य बाजारातून गायब होते आणि त्याची विक्री होते, अशा तक्रारी शासनाकडे अनेकदा आलेल्या आहेत. याप्रकरणी सेवा पुरवठादाराविरोधात गुन्हेही दाखल आहेत. धान्याचा काळाबाजार, स्वस्त धान्य दुकान वेळेवर न उघडणे अशाही अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. आता हे एटीएम मशीन त्यावर फायदेशीर ठरणार आहे.

डिजिटल सिस्टिममुळे धान्याची चोरी आणि काळाबाजार यांना आळा बसेल. हे मशीन २४ तास उपलब्ध असल्याने कामगारांना केव्हाही योजनेचा लाभ घेता येईल. पात्र लाभार्थ्यांपर्यंत १०० टक्के धान्य पोहोचेल.

नाशिकमध्ये सरकारने हा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अन्न आणि नागरी पुरवठा विभाग धान्य एटीएम मशीन सुरू करणार आहे. ग्रामीण भागातही हे मशीन बसवले जाणार आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने हे डिजिटल पाऊल टाकले आहे.

धान्य एटीएम ई-पॉस प्रणालीशी जोडलेले असल्याने वन नेशन वन रेशन कार्ड व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य देण्याची सोय सुरू करण्यात आली आहे. मात्र या केंद्रावर इतर जिल्ह्यांतील किंवा इतर प्रदेशांतील लाभार्थ्यांना धान्य देता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. त्याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ