शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बेस्ट बसमध्ये तिकिटासाठी युपीआय पेमेंटची तयारी, मुंबईकरांना दिवाळीत दिलासा?

बेस्ट बसमध्ये तिकिटासाठी युपीआय पेमेंटची तयारी, मुंबईकरांना दिवाळीत दिलासा? छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 शहर डेस्क

बेस्ट प्रशासन बसमध्ये तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना युपीआय पेमेंटचा पर्याय देण्याच्या तयारीत आहे. बेस्ट समितीचे सदस्य अजय सिंह यांनी ही मागणी लावून धरली आहे.

मुंबईकरांना ऐन दिवाळीत बेस्टकडून एक भेट मिळणार आहे. बेस्ट प्रशासन बसमध्ये तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना युपीआय पेमेंटचा पर्याय देण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांचा ताण आणखी कमी व्हावा, यासाठी बेस्ट हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे संकेतही मिळाले आहेत.

बेस्ट बस ही मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन मानली जाते. या बसमध्ये तिकीट काढण्यासाठी आता युपीआय पेमेंटची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना सुट्ट्या पैशांची अडचण भासू नये आणि तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, यासाठी हा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. थोडक्यात, बसमध्ये चढल्यावर तिकिटासाठी सुट्टे पैसे शोधण्याची गरज पडू नये, ही यामागची अपेक्षा आहे.

बेस्ट समितीचे सदस्य अजय सिंह यांनी या मागणीकडे लक्ष वेधले आहे. बंगळुरू, हैदराबाद, भुवनेश्वर आणि नागपूर यांसारख्या शहरांतील सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. मग देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बेस्ट बससेवेत ही सुविधा का नसावी, असा सवाल अजय सिंह यांनी उपस्थित केला आहे.

अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसतात, त्यामुळे तिकीट काढताना अडचणी येतात. युपीआय पेमेंटचा पर्याय मिळाल्यास प्रवाशांसोबतच बसच्या वाहकांचीही गैरसोय दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे बेस्ट प्रशासन या प्रस्तावावर काय निर्णय घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

रेल्वेकडूनही डिजिटल पर्यायाचा स्वीकार

बेस्ट प्रशासनाच्या आधीच रेल्वे प्रशासनाने ऑनलाइन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. रेल्वेच्या तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी डिजिटल पेमेंटची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मासिक पासपासून तिकिटापर्यंत सगळ्यासाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडता येतो. प्रवाशांसाठी रेल्वेचे मोबाईल अॅपही आहे, आणि गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे प्रवासी ऑनलाइन तिकीट काढण्याची सुविधा वापरत आहेत.

बेस्टकडे ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी अॅपची सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. आता बेस्ट प्रशासन तिकिटासाठी युपीआय पेमेंटचा पर्याय स्वीकारण्याच्या तयारीत आहे. हा पर्याय सुरू झाल्यास त्याचा मोठा फायदा बेस्ट बसच्या प्रवाशांना होणार आहे.

#मुंबई#शहर#PT24#Civic#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ