लाडकी बहीण योजनेनंतर एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना, शाळा आणि कॉलेजमधून माहिती गोळा
राज्य सरकार एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आणण्याच्या तयारीत आहे. राज्यात 12 लाखांहून अधिक एकल महिला असल्याचा अंदाज आहे, आणि शाळा-कॉलेजमधून त्यांची माहिती गोळा केली जात आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्य सरकार आता एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आणण्याच्या तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय ठरली होती. मात्र ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाखो बहिणी या योजनेतून बाद झाल्या आणि त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार आरोप केले. या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांसाठी आणखी एक मोठी योजना आणण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील एकल महिलांसाठी सरकार मोठे पाऊल टाकत आहे.
ही योजना पतीचे निधन झालेल्या, घटस्फोट झालेल्या आणि परितक्त्या महिलांसाठी फायद्याची ठरणार आहे. या महिला खमकेपणाने एकट्याच कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. अशा महिलांसाठी वेगळी योजना असावी, असा सरकारचा विचार आहे.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात या योजनेची प्राथमिक माहिती दिली. लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय झाली, त्याच धर्तीवर एकल महिलांसाठी राज्य सरकार लवकरच नवी योजना आणणार आहे. एकट्याने कुटुंबाची धुरा सांभाळणाऱ्या आणि संपूर्ण कुटुंबकबिल्याचा भार खांद्यावर घेणाऱ्या महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असेल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात किती एकल महिला आहेत, याची आकडेवारी सरकार सध्या गोळा करत आहे. एका अंदाजानुसार राज्यात 12 लाखांहून अधिक एकल महिला आहेत. विधवा, घटस्फोटित, परितक्त्या तसेच आजीवन अविवाहित राहिलेल्या महिलांचा यात समावेश असेल. या महिला मुलांच्या शिक्षणाचा आणि कुटुंबाच्या उपजीविकेचा आधार आहेत. राब राब राबून त्या कुटुंबाचा गाडा ओढतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेनंतर स्वतंत्र एकल महिला योजना आणण्याची तयारी सुरू आहे.
योजनेची संपूर्ण माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र ही योजना लवकरच जाहीर होणार आहे. योजनेच्या अटी, शर्ती आणि नियमांची माहिती अधिकृतपणे जाहीर केली जाईल.
या नव्या योजनेसाठी प्राथमिक स्तरावर शिक्षण विभाग माहिती गोळा करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वडील नाहीत, अशा मुलांची माहिती जमा केली जात आहे. ही माहिती शाळा आणि कॉलेजमधून घेतली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार राज्यात 3 लाखांहून अधिक एकल महिलांची अधिकृत नोंद समोर आली आहे.
आता पुढच्या टप्प्यात तहसील आणि गाव पातळीवरून माहिती जमा केली जाईल. त्यानंतरच राज्यातील एकूण एकल महिलांची अधिकृत माहिती हाती येईल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.